नीट अभ्यास करून या, सभेत उत्तर कोणी लिहून देणार नाही; शौमिका महाडिक यांचा चेअरमन पाटील यांना टोला | पुढारी

नीट अभ्यास करून या, सभेत उत्तर कोणी लिहून देणार नाही; शौमिका महाडिक यांचा चेअरमन पाटील यांना टोला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेला अजून काही तास शिल्लक आहेत. नीट अभ्यास व पूर्ण तयारी करून या. सभेत कोणी तुम्हाला उत्तर लिहून देणार नाही, असा टोला ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी चेअरमन विश्‍वास पाटील यांना रविवारी पत्रकाद्वारे लगावला.

गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सोमवारी होत आहे. या सभेच्या अनुषंगाने आपण काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्याला अभ्यासपूर्ण उत्तरं देतील अशी माझी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात उत्तर देण्यासाठी म्हणून चेअरमन पाटील यांनी लगेच गडबडीत पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यातील उत्तरे हास्यास्पद निघाली. तरीपण आपण त्यांचे आभार मानतो. कारण 6 रुपये दरवाढ म्हणजे वचनपूर्ती नव्हे हे त्यांनी मान्य केलं. त्यांच्या नेत्यांचा वचनपूर्तीचा दावा खोडून काढण्यावरच न थांबता वासाचे दूध परत देणं शक्य नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. ज्यामुळे त्यांच्या नेत्यांची निवडणूक काळातील आमच्यावरील टीका चुकीची होती, हेही त्यांनी सिद्ध केलं.

ठेवी, पशुखाद्य कारखान्यात झालेला तोटा, गरज नसताना घातलेला विस्तारीकरणाचा घाट, दुधाची खालावलेली प्रत, पशुखाद्याची ढासळलेली गुणवत्ता, जिल्ह्यातील संकलनात झालेली घट यांसारखे अनेक प्रश्‍न शिल्‍लक आहेत ज्यांची नेमकी उत्तरं न देता दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय अजून काही प्रश्‍न आहेत, ते सभेमध्ये विचारण्यात येतील. त्यामुळे आपण अभ्यास करून सभेला सामोरे जावे. गेली अनेक वर्षे चेअरमन विश्‍वास पाटील गोकुळमध्ये असल्याने त्यांना गोकुळच्या संपूर्ण कारभाराचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. सभासदांच्या प्रश्‍नांना बगल न देता, समर्थकांकडून गोंधळ न घालता त्यांनी प्रश्‍नांना उत्तर द्यावीत, अशी अपेक्षाही या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

Back to top button