कोल्हापूर : 5 रुपयांचा दाखला 500 रुपयांना | पुढारी

कोल्हापूर : 5 रुपयांचा दाखला 500 रुपयांना

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सीपीआरमध्ये जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर 5 रुपयांच्या दाखल्यासाठी 500 रुपयांचा भुर्दंड नागरिकांना बसत आहे. एजंटांशिवाय दाखला मिळत नाही, अशीच येथील स्थिती आहे. याकडे सीपीआर प्रशासनाने लक्ष देऊन जन्म-मृत्यू दाखल्यांची सुविधा सुलभ करावी, अशी मागणी होत आहे.

सीपीआरमध्ये जन्म किंवा मृत्यू झाल्यास अवघ्या 5 रुपयांत येथे दाखला देण्याची सोय आहे. अर्ज आणि 5 रुपयांची शासकीय पावती केल्यानंतर दाखला देण्याची सोय केली आहे. एजंटांशिवाय दाखलाच मिळत नाही, अशी येथे स्थिती आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी अर्ज कसा करायचा, हे सर्वसामान्यांना माहिती नाही. महापालिकेसारखा अर्जांचा छापील नमुना येथे उपलब्ध नाही. वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाशी लागून असलेल्या खोलीत जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसंबंधित माहिती दिली जाते.

अर्जाचा नमुना दरवाजावर चिकटविला आहे. त्यानंतर दाखल्यासाठी हस्तलिखित अर्ज करावा लागतो. अर्ज, दाखल्यासाठी केलेली शासकीय 5 रुपयांची पावती आवक-जावक विभागात द्यावी लागते; पण या सर्वासाठी एजंट घेतल्याशिवाय काम होत नाही, अशी येथील स्थिती आहे. चार ते पाच एजंट सकाळपासून या कार्यालयाबाहेर घुटमळत असतात. त्यांच्यामार्फत गेल्यास दाखल्याचे आपसूक काम होते.

सीपीआरमध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांचीदेखील जन्म-मृत्यूची नोंद सीपीआरमध्ये होते. प्रवासाचा आणि दाखल्यासाठी खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. जन्म-मृत्यू दाखला विभागात सीपीआर प्रशासनाने समाजसेवा अधीक्षक यांची नियुक्‍ती करावी. येथे दाखल्यासाठी येणार्‍या नातेवाईकांना त्यांनी मदतीचा हात दिल्यास दाखल्यांसाठीची एजंटगिरी बंद होईल.

दाखला पोस्टाने मिळावा

जन्म-मृत्यूनंतर एक महिन्याने नातेवाईकांना दाखला मिळतो. त्यासाठी प्रत्यक्ष येऊन अर्ज करावा लागतो. पुन्हा तो दाखला घेण्यासाठी नातेवाईकांना सीपीआरमध्ये यावे लागते. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोकांना सीपीआरमध्ये जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी किमान दोनवेळा यावे लागते. त्यासाठीचा प्रवासाचा खर्च न परवडणारा आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर दाखला थेट पोस्टाने किंवा ऑनलाईन मिळावा, अशी नातेवाईकांची मागणी आहे. त्यासाठी सीपीआर प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Back to top button