इचलकरंजीत मटका अड्ड्यावर छापा; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त | पुढारी

इचलकरंजीत मटका अड्ड्यावर छापा; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : शहरात मध्यवस्तीत सुरू असलेल्या ऑनलाईन मटक्याच्या अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत मटका बुकी राकेश शरद गायकवाड (वय 33) व तुषार रघुनाथ जांभळे (25, दोघे रा. हातकणंगले) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4 मोबाईल, दुचाकी, 23 हजारांची रोकड आदींसह सुमारे 1 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलिस ठाण्यात सुरू होते.

मुख्य रस्त्यावरील गोविंदराव हायस्कूलसमोर उपनिबंधक कार्यालयाशेजारील जिनगोंडा भाऊ पाटील नामक व्यक्तीच्या मालकीच्या इमारतीमध्ये ऑनलाईन मटका घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकास मिळाली. सायंकाळी या ठिकाणी छापा टाकण्यात आला. फ्लॅट भाड्याने घेऊन मटका बुकी राकेश गायकवाड हा अड्डा चालवत होता. तर त्याचा साथीदार तुषार जांभळे हा त्याच्यासाठी ऑनलाईन मटका घेत होता. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पाटील, सागर हारगुले, संतोष साळुंखे, शहाबाज गवंडी, रवी महाजन, सलमान नदाफ आदींच्या पथकाने केली. दरम्यान कबनूर येथील फरांडे मळ्यात येथे मटका घेणार्‍या महेश प्रकाश सोलापुरे (वय 42, रा. फरांडे मळा) यास पकडून त्याच्याकडील 1,150 रुपये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

Back to top button