वारणा दूध संघाची गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रु. वाढ | पुढारी

वारणा दूध संघाची गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रु. वाढ

वारणानगर ; पुढारी वृत्तसेवा : वारणा दूध संघाने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केल्याची घोषणा वारणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. गणेशोत्सव व सणाच्या पार्श्वभूमीवर दरवाढ दिल्याने दूध उत्पादकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

दूध उत्पादकांना पशुखाद्य व महागाईने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने 1 सप्टेंबर पासून गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर दोन रुपयेप्रमाणे वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे कोरे यांनी सांगितले.

आता 3.5 फॅटला व 8.5 एस.एन.एफ.ला हा दर 32 रुपये झाला आहे. यापूर्वी 21 मार्च व 21 एप्रिल रोजी गायीच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये वाढ दिली होती. आता तिसर्‍यांदा ही दरवाढ करण्यात आली आहे.

वारणा दूध संघाची दही, लस्सी, ताक, दूध या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ झाली असून वारणा श्रीखंडाची यावर्षी विक्रमी विक्री झाल्याचे कोरे म्हणाले.

महापूर, अवकाळी पाऊस अशा अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला आहे. अल्पदरात पशुवैद्यकीय सेवा, विमा सुरक्षाकवच, व रेडी संगोपन यासारखे उपक्रम राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटंट मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ.अशोक पाटील, मार्केटिंग इनचार्ज अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.

Back to top button