कोल्हापूर : मंडप तपासणीसाठी पोलिस पथके | पुढारी

कोल्हापूर : मंडप तपासणीसाठी पोलिस पथके

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पाहोचली आहे. ठिकठिकाणी मंडप उभारणीही करण्यात येत आहे. वाहतुकीला अडथळा न करता हे मंडप उभारावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच एक खिडकी योजनेतून परवानगी देतानाही मंडपाची जागा, आकार याची माहिती भरून घेतली जात आहे. तरीही कोणी नियमबाह्य मंडप उभारणी केली आहे का, हे पाहण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.

गणेशमूर्ती विराजमान होणारे मंडप, देखाव्यांसाठीचे सेट उभारणीची कामे सध्या सुरू आहेत. अनेक मंडळांकडून याची माहिती प्रशासनाला दिली जात नाही. यामुळे काही प्रमुख मार्ग या काळात बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होते. हे टाळण्यासोबत एखादी आपत्कालीन घटना घडल्यास मदत पोहोचविण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आता मंडपांची प्रत्यक्षात तपासणी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

एक खिडकी योजनेतून परवानगी घेताना किती खांबांचा मंडप उभारणार त्यानुसार महापालिका पैसे भरून घेते. तसेच मंडप, चारही बाजूंचे रस्ते, महत्त्वाच्या इमारती यांचा नकाशाच मंडळाच्या पदाधिकार्‍याकडून बनवून घेतला जातो, पण खड्ड्यांचे पैसे कमी भरून अनेकदा मंडळांकडून जादा खांबाचे मंडप, सजावट केली जाते.

अतिक्रमण विभाग व पोलिसांचे संयुक्‍त पथक

वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे मंडप, विना परवाना उभारण्यात आलेले मंडप, स्वागत कमानी, चुकीची माहिती देऊन उभारण्यात आलेले मंडप अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग, हद्दीतील पोलिस ठाण्याचे कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी यांचे संयुक्‍त पथक मंडपांची पाहणी करणार आहेत. तसेच नियमबाह्य मंडप उभारणी केल्यास कारवाईही करण्यात येणार आहे.

Back to top button