किणी; पुढारी वृत्तसेवा : मुदत संपूनही पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कर वसुली ही अद्याप सुरूच आहे. ही करवसुली तातडीने बंद करावी या मागणीसाठी किणी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने बँड बाजासह कलश मिरवणूक काढत, हे आंदोलन करण्यात केले. जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत, आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे किणी (जि.कोल्हापूर) व तासवडे (जि.सातारा) हे दोन्ही टोलनाके २४ जूनच्या मध्यरात्री हस्तांतरीत करण्यात आले. मुदत संपली असतानाही टोल वसूली सुरूच ठेवण्यात आली आहे. या टोलसाठी सहा पदरीकरणाचे कारण सांगण्यात येत आहे. पण सहा पदरी रस्ता, अद्याप झालेलाच नाही. आतापर्यंत केलेल्या खर्चाचा व वसुलीचा हिशोब न देताच वाहनधारक जनतेला लुटण्याचे काम ठेकेदार, केंद्र व राज्य शासनाचे अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. असा आरोप करत, या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनात बँड पथक, डोक्यावर कलश घेतलेल्या सुवासिनी यांचेसह शेकडो मनसैनिक प्रचंड घोषणाबाजी करत किणी टोल नाक्यावर आले. पोलिसांनी या सर्वांना नाक्यापासून दूर रोखण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांनी मागे हटण्यास नकार दिला. वाजत गाजत आंदोलनकर्त्यांनी टोल नाका गाठला, महिला आंदोलकांनी आपल्या डोक्यावरील कलश टोल नाक्याच्या बुथजवळ ठेवले. वाहतूक ठप्प होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना तिथून हटण्याची विनंती केली. मात्र यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्याच ठिकाणी ठिय्या मांडला.
यावेळी 'टोल वसुली थांबलीच पाहिजे', 'वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलीसांनी एका आंदोलकाची उच्चल बांगडी करत, त्याला गाडीत टाकले. आंदोलन मोडित काढण्याचा पोलीसांनी प्रयत्न केला. पण पोलिसांना न जुमानता आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले. अजून किती दिवस टोल वसूल करणार? अजून किती रुपये वसुली होणार? याचा फलक का लावला नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर केली.
आंदोलनावेळी सुमारे दहा ते पंधरा मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. राष्ट्रीय प्राधिकरणाचे अधिकारी चंद्रकांत बर्डे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना राजू जाधव यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाने वाहनधारकांची लूट चालवली असून, मुदत संपलेला टोल नाका बंद होईपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. आंदोलनात संतोष चव्हाण, प्रवीण माने, वैभव हिरवे, कल्पना पाटील, वंदना संताजी, उज्वला मिसाळ, अक्षय माने, अशोक पाटील, गणेश बुचडे, अजित पाटील यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.एन.तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.