कोल्हापूर : खंडपीठासाठी जागेचा प्रश्न मार्गी लावू : राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

कोल्हापूर : खंडपीठासाठी जागेचा प्रश्न मार्गी लावू : राधाकृष्ण विखे-पाटील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन होणे सहा जिल्ह्यांसाठीही गरजेचे आहे. यासाठी जागेचे आरक्षण टाकणे आवश्यक आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. रविवारी ते कोल्हापूर दौर्‍यावर आले असता खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने खंडपीठ कृती समितीने त्यांची भेट घेतली.

खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके यांनी कोल्हापूर खंडपीठकरिता येथील शेंडा पार्क येथील जागा आरक्षण होऊन मिळावी, याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेने ठराव पारित केल्याचे सांगितले. तसेच त्यानुसार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी करवीर, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे रितसर कागद तपासणी करून खंडपीठ जागा आरक्षण प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केली.

यावर डॉ. विखे-पाटील यांनी खंडपीठ कोल्हापूर येथे होणेकरिता जागा आरक्षणाच्या अंतिम टप्प्यावर प्रलंबित असलेला प्रश्न लवकर मार्गी लावला जाईल, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही कार्यालयीन पाठपुरावा करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, सचिव विजयकुमार ताटे, अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण उपस्थित होते.

Back to top button