कोल्हापूर : ‘संघर्ष’ने फोडली युवा शक्तीची दहीहंडी | पुढारी

कोल्हापूर : ‘संघर्ष’ने फोडली युवा शक्तीची दहीहंडी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एकजुटीची ताकद, परस्पर समन्वय अन् आत्मविश्वास यांच्या जोरावर तब्बल 7 थरांचा भव्य मनोरा रचत गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने 37 फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची दहीहंडी फोडली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी तब्बल पाचवेळा फोडणार्‍या गडहिंग्लजच्याच नेताजी पालकर संघासह तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाहून सरस कामगिरी करून संघर्ष पथकाने बाजी मारली. तब्बल 3 लाखांच्या बक्षिसासह इतर विविध प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन या गोविंदा पथकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

धनंजय महाडिक युवा शक्ती व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकात ‘युवा शक्ती’च्या दहीहंडीचा थरार झाला. पावसाच्या रिमझिम, साऊंड सिस्टीमचा दणदणाट, नेत्रदीपक लाईट सिस्टीम आणि आबालवृद्धांच्या उत्साही उपस्थितीत अशा उत्साही वातावरणात यंदाचा दहीहंडी सोहळा झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमापूजन व श्रीफळ वाढविण्यात आले.

सलामीनंतच्या चौथ्या प्रयत्नांत यश

प्रारंभी 50 फुटांवर बांधलेली युवा शक्ती दहीहंडीसाठीची सलामी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी सुरू झाली. नेताजी पालकर संघाने 6 थर रचून यंदा सलग सहावी दहीहंडी फोडण्याचा इशारा दिला. संघाचे प्रमुख कै. नेताजी पालकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीमती लता पालकर यांनी संघाचे नेतृत्व केले. पाठोपाठ संघर्ष पथकाने 5 थर रचून आपणही सज्ज असल्याचे सांगितले. तासगावच्या शिवगर्जनानेही सहा थर रचून आपणही दहीहंडी फोडू शकतो याची झलक दाखविली. यानंतर चिमुकल्या मुलीच्या हस्ते लॉट्स पाडण्यात आले. त्यानुसार तिन्ही संघांच्या प्रयत्नानंतर दहीहंडीची उंची प्रत्येक फेरीवेळी अनुक्रमे 43, 40, 38 व 37 अशी कमी करण्यात आली. चौथ्या प्रयत्नात संघर्ष गोविंदा पथकाने 7 थर रचत दहीहंडी फोडली. सोनू राजू कोरवी या बालगोविंदाने सर्वात वरच्या थरावर जाऊन हे अवघड लक्ष्य साध्य केले. रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी दहीहंडी फुटली.

खेळाडूंचा सन्मान…

दहीहंडीच्या निमित्ताने धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पै. पृथ्वीराज पाटील व रेश्मा माने, वैष्णवी पाटील, ऐश्वर्या जाधव, निदा सतारमेकर, शुक्ला बिडकर, गिरीजा बोडेकर, खुशी कांबोज, वैष्णवी डोंबले, सानिका पाटील, आर्या मोरे, शर्वरी डोणकर, समृद्धी कटकोळे, राजनंदिनी भोईटे, पृथ्वी गायकवाड, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे व रघु पाटील यांचा यात समावेश होता.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सत्कार ताराराणी आघाडी व भाजपतर्फे करण्यात आला. दहीहंडी सोहळ्यास खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आ. अमल महाडिक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मनपाच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, विश्वराज महाडिक, शौमिका महाडिक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

Back to top button