दै. पुढारी ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ | पुढारी

दै. पुढारी ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : भ्रमंतीतील अनेक पर्यायांची माहिती व पर्यटकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणारे दै. पुढारी ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स 2022’ हे प्रदर्शन शनिवार (दि. 20) पासून सुरू होत आहे. देश-विदेशातील टूर्स पॅकेजेसचे अनेक पर्याय देणार्‍या पर्यटन संस्थांचा यात सहभाग असणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. बसंत-बहार रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये 20 ते 22 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. गगन टूर्स या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक अ हेवन हॉलीडेज् आहेत.

तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनात पर्यटकांना विविध टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून विविध पॅकेजेसची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. पाच हजार ते पाच लाखांपर्यंत बजेट असलेल्या टूर्सबद्दल एकाच ठिकाणी माहिती घेण्याची ही उत्तम संधी आहे. अनेक संस्थांकडून विविध टूर्सवर भरघोस डिस्काऊंट, महिला मंडळे, संस्था तसेच ग्रुप बुकिंगवर विशेष सवलती, सर्वसामान्यांच्या बजेटमधील सहली हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहे.
प्रदर्शनात नामांकित पर्यटन संस्थांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण टूर पॅकेजेसचे थेट बुकिंगही करता येणार आहे. यामध्ये पर्यटकांना हिवाळी आणि उन्हाळी पर्यटनासाठीच्या विविध बजेटमधील, तसेच उत्तम सोयीसुविधा पुरवणार्‍या टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनातून पर्यटकांना देश-विदेशातील सहलींबरोबरच पर्यटनाच्या माहितीचा खजिना खुला होणार आहे. ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा, धार्मिक ठिकाणे, नवदाम्पत्यांसाठी खास हनिमून पॅकेजेस, कृषी पर्यटन, अभ्यास सहलींचा प्रदर्शनात समावेश आहे. स्थानिक पर्यटन संस्थांसह जगप्रसिद्ध विविध संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Back to top button