कोल्हापूर : दत्तवाड येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी | पुढारी

कोल्हापूर : दत्तवाड येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील टाकळीवाडी रस्त्यावरील शेतात वडिलांना चहा देऊन परत येत असताना मोकाट कुत्र्यांनी एका बालिकेवर जोरदार हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. अपूर्वा अण्णाप्पा शिरढोणे (वय १३) असे बालिकेचे नाव आहे. तिच्यावर मिरज सिविल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की, अपूर्वाचे वडील अण्णाप्पा शिरढोणे शेतात भुईमुगावर औषध फवारणीसाठी गेले होते. सकाळी ९ वाजता वडिलांना चहा व नाष्टा देण्यासाठी अपूर्वा शेतात गेली होती. चहा देऊन परतत असताना तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी तिच्या मानेवर, कानावर, कंबर व मांडीवर चावा घेतला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिचा आरडाओरडा ऐकून वडील व इतर शेतमजुरांनी धावत जाऊन तिची कुत्र्यांपासून सुटका केली. ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी मिरज सिविल येथे पाठवण्यात आले.

याआधीही जानेवारी २०२१ मध्ये अशाच प्रकारे दत्तवाड येथे मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये एक शेतमजूर महिला व पुरुष यांचा बळी गेला होता. तसेच दोन शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button