कोणतेही खाते छोेटे-मोठे नसते : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

कोणतेही खाते छोेटे-मोठे नसते : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोणतेही खाते छोटे-मोठे, दोन किंवा तीन क्रमांकाचे असे काही नसते, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले. खाते वाटपावरून असलेली काही मंत्र्यांची नाराजी दूर करण्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समर्थ आहेत, असेही त्यांनी सांगितले.

भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये पाटील यांच्याकडे दुसर्‍या क्रमांकाचे खाते होते, आता कुठेतरी त्यापेक्षाही खालच्या क्रमाकांचे खाते मिळाल्याची चर्चा आहे, याबाबत विचारता कोणतेही खाते छोटे-मोठे कधीच नसते. ते दोन, तीन, चार अशा कोणत्या क्रमांकाचेही नसते. आपले काम सर्वजण बघत असतात असे सांगत पाटील म्हणाले, केंद्र शासनाने नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. यापूर्वी इंग्रजांनी शिक्षण आणले, लोकांना शिक्षित केले. मात्र, त्यावेळी बुद्धी विदेशी होती. आता त्यात बदल होत आहेत. या नव्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे. यापूर्वी आयात केले जाणारे सैन्यातील साहित्य आता आपण निर्यात करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागात यापूर्वीच्या सरकारने काय काम केले, त्याचा आढावा घेऊ, जे चांगले होते ते पुढे नेऊ, जे चुकीचे होते त्यावर निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. तोट्यातील, बंद पडलेल्या सूतगिरण्यांना त्यांची अतिरिक्‍त जागा विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी यापूर्वीच आपण मागणी केली होती. त्यामुळे त्यातून सूतगिरण्यांना भांडवल उभे करता येईल. ज्या सूतगिरण्यांनी केवळ अनुदानच लाटले असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सरकारकडून कापूस खरेदी करून तो साठवून ठेवता येईल का, याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघातातील ट्रक सापडला आहे. त्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी काही माहिती मिळाली तरी सर्व बाजूने सखोल चौकशी केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Back to top button