

परकीय जुलमी राजवट नष्ट करून छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम- स्वराज्य निर्माण केले. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर पेशवाईत मराठा सत्ता काबीज करून ब्रिटिशांनी महाराष्ट्रावर आपला युनियन जॅक फडकवला. मात्र, शिवछत्रपतींना आपला आदर्श मानणार्या महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला हे पारतंत्र्य रुचणारे नव्हते. त्यांनी इंग्रजांचे राज्य नष्ट करून स्वराज्याचा जरीपटका भगवा ध्वज फडकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. यात कोल्हापूर सर्वात आघाडीवर होते. रणरागिणी ताराराणींचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरकरांनी पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपला लढा अखंड-अविरतपणे सुरू ठेवला.
गडकर्यांच्या बंडात राष्ट्रीयत्वाची भावना
'लष्कराचे सहाय्य घेऊन बंडाचा बीमोड करण्यापूर्वी ते इतके उग्र स्वरूपाचे बनले होते की, कोल्हापूर राज्याशी संबंधित असलेला प्रत्येक माणूस यात सहभागी झालेला होता. अशा प्रकारची शत्रुत्वाची भावना काही मूठभर लोकांच्या कटकारस्थानामुळे निर्माण झाली असावी, ही गोष्ट पटण्यासारखी नाही. त्यामध्ये स्थानिक किंवा विशिष्ट समाज नसून राष्ट्रीय भावना असली पाहिजे. जे काही घडले ते कोल्हापूर राज्याचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा सार्वत्रिक उठाव होता,' असे वर्णन स्वतः इंग्रज अधिकारी मेजर माल्कम याने मेजर ग्रॅहॅमला इ. स. 1844 ला सादर केलेल्या अहवालात केले आहे. यावरून इ. स. 1857 ला झालेला उठाव स्वातंत्र्यासाठीचा पहिला उठाव नसून सन 1844 ला म्हणजेच सुमारे 12 वर्षे अगोदर कोल्हापूरच्या जनतेने इंग्रज सत्तेविरुद्ध भारतीय स्वातंत्र्यासाठी दंड थोपटल्याचे उदाहरण आहे.
भुदरगडावर बंडाची ठिणगी
22 जुलै 1844 रोजी भुदरगडावर गडकर्यांच्या बंडाची ठिणगी पडली. इंग्रजांच्या जाचक राज्यकारभाराविरुद्ध हा स्फोट होता. या बंडाचे लोण अल्पावधीतच पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, सामानगड, मनोहरगड, मनसंतोषगड असे संपूर्ण जिल्हाभर पसरले. पाठोपाठ सावंतवाडी, रत्नागिरी, मालवण या कोकण प्रदेशातही याचे पडसाद उमटले. या बंडात कोल्हापूरच्या राजघराण्यापासून ते सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
'मोडेन, पण वाकणार नाही' या भावनेने कोल्हापूरकर लढले. सुमारे पाच महिने कोल्हापूरकरांचा हा स्वातंत्र्यासाठीचा लढा सुरू होता. या सशस्त्र लढ्याची चौकशी करण्यासाठी इंग्रजांनी लिम्सडेन या अधिकार्याची नेमणूक केली. त्याने बंडाला चिथावणी देणार्या कोल्हापूर कारभारी सईबाई ऊर्फ दिवाणसाहेब यांना हद्दपार करून पुण्यात नजरकैदेत ठेवले. याशिवाय बंडात सहभागी सुमारे 250 लोकांना पकडून धारवाडच्या तुरुंगात रवानगी केली.
दोघा सरदारांचे सरंजाम जप्त केले आणि सुमारे 40 हजार रुपये कोल्हापूरच्या जनतेकडून दंड म्हणून वसूल केले. इंग्रजांच्या जुलमी सत्तेला सुरुंग लागला. इंग्रज खडबडून जागे झाले. असे बंड परत करू नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले; पण इ. स. 1844 च्या उठावाची ठिणगी अशी तशी शमणारी नव्हती. कोल्हापूरच्या जनतेने केलेल्या बंडाचे दूरगामी परिणाम देशभर इ. स. 1857 साली स्वातंत्र्य उठावाच्या घटनेतून पाहायला मिळाले. किंबहुना यानंतरच्या 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातही कोल्हापूरकर आघाडीवरच होते.
– सागर यादव