क्षयरोगी जिनांचा मृत्यू होणार हे माहीत असते तर माऊंटबॅटन यांनी फाळणीच केली नसती! | पुढारी

क्षयरोगी जिनांचा मृत्यू होणार हे माहीत असते तर माऊंटबॅटन यांनी फाळणीच केली नसती!

रिचर्ड अ‍ॅटनबरोच्या ज्या ‘गांधी’ या गाजलेल्या चित्रपटाने संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवली, त्याच्या पटकथेची प्रेरणा होती ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’! अमेरिकन लेखक लॅरी कॉलिन्स आणि प्रख्यात फ्रेंच पत्रकार व लेखक डॉमिनिक लॅपिएर यांनी पाच वर्षे अथक प्रयत्नांनी भारताच्या मध्यरात्री मिळालेल्या स्वातंत्र्यावर हे बहुचर्चित पुस्तक लिहिले अन् ते अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय ‘बेस्ट सेलर’ ठरले. 800 किलोंपेक्षा अधिक वजनाची लेखनसामग्री, मुलाखती आणि ऐतिहासिक दस्तावेजाच्या 900 प्रती शोधून त्यांनी लिहिलेल्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ला अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली, भारत आणि पाकिस्तानात अमाप प्रसिद्धी मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या पुस्तकातील काही अंशांचा परामर्श फक्त दै. ‘पुढारी’च्या वाचकांसाठी…

कोल्हापूर : देविदास लांजेवार

“मोहम्मद अली जिना यांना क्षयरोग झाला आहे आणि ते काही दिवसांचे पाहुणे असून लवकरच मरणार आहेत; हे फाळणीच्या आधी कळले असते तर आजचा इतिहासच वेगळा असता. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी काही महिने आणखी लागले असते. परंतु अखंड हिंदुस्तानची फाळणी टळली असती. पाकिस्तान अस्तित्वातच आला नसता. भारत अखंड राहिला असता आणि तीन युद्धेही झाली नसती…”

‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या जगप्रसिद्ध बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक व पत्रकार डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स यांनी घेतलेल्या अर्ध्या तासाच्या रेकॉर्डेड मुलाखतीत भारताचे शेवटचे व्हॉईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे हे उद्गार आहेत. भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तानंतर इंग्लंडमधील बोर्डलँडस्मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करीत होते. या फाळणीच्या इतिहासाची सर्वाधिक अधिकृत माहिती त्यावेळी फक्त माऊंटबॅटन हेच देऊ शकत होते. त्यामुळे या लेखकांनी तब्बल 19 वेळा माऊंटबॅटन यांच्या भेटी घेतल्या आणि त्यानंतर अर्ध्या तासाची मुलाखत रेकॉर्ड केली. या मुलाखतीत माऊंटबॅटन यांनी फाळणीच्या इतिहासातील अनेक पैलू बोलून दाखविले.

मुंबईतील प्रख्यात डॉ. जाल पटेल हे मोहम्मद अली जिना यांच्यावर उपचार करीत होते. टीबीने (क्षयरोग) मोहम्मद अली जिना यांचे दोन्ही फुफ्फुस निकामे झाले होते. 1947 साली फाळणीच्या आधी डॉ. जाल पटेल यांनी जिना यांना सांगितले होते की, ‘टीबीने तुम्हाला जर्जर केलेले आहे आणि तुम्ही फार तर सहा महिने जगू शकता.’

हा क्षयरोग फाळणीच्या आड येऊ शकतो, याची जाणीव झाल्याने जिना यांनी डॉ. पटेल यांना या रोगाबद्दल कमालीची गोपनीयता पाळण्याची ताकीद दिली होती. त्यांची बहीण आणि मुलीलाही क्षयरोगाबद्दल माहिती होऊ नये, याची खबरदारी जिना यांनी घेतली होती. स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीबाबतची चर्चा जेव्हा माऊंटबॅटन यांच्याशी सुरू होेती तेव्हा ‘शक्य तेवढ्या लवकर फाळणीचा निर्णय घ्यावा’, असा रेटा जिना यांनी माऊंटबॅटन यांच्याकडे सातत्याने लावला होता. आपणास क्षयरोग आहे हे माऊंटबॅटन, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना माहिती झाले तर फाळणी होणारच नाही, हे जिना यांना पक्के ठाऊक होते. त्यामुळे ते फाळणीची घाई करीत होते.

भारत – पाकिस्तान फाळणीनंतर पुस्तकाच्या कामानिमित्त मुलाखतीसाठी ब्रिटनला गेलेल्या डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स या दोन्ही लेखकांनी डॉ. जाल पटेल यांचा एक्स रे रिपोर्ट त्यांना दाखवला अन् माऊंटबॅटन म्हणाले, ‘ओ माय गॉड्’!

“1947 च्या एप्रिलमध्ये जिना यांच्यासोबत माझ्या सहा बैठका झाल्या. या प्रत्येक बैठकीत जिना वेगळ्या राष्ट्राची मागणी रेटून धरत होते. ही मागणी करताना ते लवकरात लवकर निर्णय घ्या, असा तगादा लावत होते. याचवेळी मला हे माहिती असते की जिना काही दिवसांचेच पाहुणे आहेत. तर मी निश्चितच भारताच्या अखंडतेवर ठाम राहिलो असतो,” असे उद्गार माऊंटबॅटन यांनी या पत्रकारांशी बोलताना काढले होते.

अडेलतट्टू जिनांमुळेच फाळणी

ब्रिटिश साम्राज्याचा शेवटचा व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देताना तो अखंड राहावा यासाठी तत्कालीन चार महान नेत्यांशी वन-टू-वन चर्चा केली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मोहम्मद अली जिना यांच्याशी चर्चेचे फड अनेकदा रंगले. हे चारही नेते त्या काळातील दिग्गज बॅरिस्टर होते. चौघांनीही लंडन येथील कायद्याची प्रसिद्ध संस्था ‘इन्स ऑफ कोर्ट’मध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. या चौघांपैकी तिघे ‘भारताला स्वातंत्र्य मिळावे, पण एकसंध अखंड भारत म्हणूनच’, अशी भूमिका माऊंटबॅटन यांच्यापुढे स्पष्ट केली होती.

मात्र मुस्लिम लीगचे नेते असलेले जिना हे एकमेव धर्मांध नेते होते. त्यांना मुस्लिम राष्ट्र म्हणून स्वतंत्र पाकिस्तान हवा होता. 10 एप्रिल 1947 रोजी माऊंटबॅटन आणि जिना यांची शेवटची चर्चा झाली. माऊंटबॅटन यांनी जिना यांना हे निक्षून सांगितले की “जो वेगळा पाकिस्तान तुम्हाला मिळेल, तो कधीच स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही. माणूस हा हिंदू, मुसलमान होण्याआधी पंजाबी किंवा बंगाली नसतो तर तो सर्वप्रथम भारतीय असतो. त्यामुळे हिंदुस्थानच्या ऐक्याला बाधा येईल, असा पाकिस्तान तुम्ही मागू नका! मात्र मोहम्मद अली जिना अडेलतट्टू होते. मी कल्पनाही करू शकत नाही की, बॅरिस्टरची पदवी घेतलेला एवढा सुशिक्षित माणूस आपला मेंदू धर्मांधतेमुळे गहाण ठेवू शकतो, तो अडेलतट्टू असू शकतो, ज्यामुळे उप-महाद्वीपकल्पात अराजक आणि हिंसाचार माजण्याची बीजे पेरली गेली. जिनांमुळेच अखंड भारताचे दोन तुकडे करावे लागले.” दोन लेखकांना दिलेल्या रेकॉडर्र्ेड मुलाखतीत माऊंटबॅटन यांनी वरील तपशील सांगितला होता.

Back to top button