कोल्हापूर : ब्रिटिश सैन्याची कार्यपद्धती ते स्वातंत्र्य चळवळीचा अनुभव

कोल्हापूर : ब्रिटिश सैन्याची कार्यपद्धती ते स्वातंत्र्य चळवळीचा अनुभव
Published on
Updated on

नृसिंहवाडी : विनोद पुजारी : सैनिक टाकळी गावाने स्वातंत्र्यपूर्व काळातील युद्धे अनुभवली होती. टाकळी गावातील तरुणांना तत्कालीन ब्रिटिश सैन्यातील व्यवस्था आणि स्वातंत्र्य चळवळ जवळून पाहता आली होती; पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सैन्य दलाची घडी बसवणे आवश्यक होते. सैनिक टाकळीतील अनेक तरुण स्वातंत्र्यानंतर देखील सैन्यात भरती झाले. देशप्रेमाचा हा वारसा टाकळीच्या सुपुत्रांनी सदोदित पुढे चालू ठेवला.

1947 पासूनच्या सर्व युद्धात सैनिक टाकळी गावचे आठ जवान शहीद झाले. 1962 साली चीनसोबत झालेल्या युद्धात शिपाई शंकर दत्तू जाधव यांना वीरमरण आले. 1962 सालच्या पाकिस्तान सोबतच्या युद्धात हवालदार भीमराव दत्तू पाटील शहीद झाले. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले तरीही तो सैनिक अजून जिवंत असेल आणि उठून गोळी घालेल या भीतीने पाकिस्तानी सैनिक त्यांच्याजवळ गेले नाही.

यानंतर 1971 साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्राम युद्धात भारतीय सैन्याने भीम पराक्रम केला होता. यात शिपाई रावसाहेब कृष्णा पाटील यांनी ढाका येथे प्राणार्पण केले. युद्ध मैदानावर जखमी झालेल्या रावसाहेब पाटील यांच्यापर्यंत बचाव यंत्रणा पोहोचण्याआधीच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात भारत सरकारने त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पाटील यांचा सन्मान केला.

1987 साली भारतीय फौज श्रीलंकेत शांती सेना म्हणून कार्यरत होती. तमिळ बंडखोरांसोबत झालेल्या या युद्धात टाकळीतील अनेक जवानांनी पराक्रमाची शर्थ केली होती. यात शिपाई रावसाहेब तातोबा पाटील शहीद झाले. युद्धात झालेल्या गोळीबारामुळे पाटील यांच्यावर श्रीलंकेतच भारतीय सैन्याने अंत्यसंस्कार केले. याच वर्षी सियाचीन येथील भारतीय चौकी काबीज करण्याच्या हेतूने शत्रूकडून हल्ले होत होते. सियाचीनची चौकी ही अतिदुर्गम आहे.

सतत होणारी बर्फवृष्टी आणि ऑक्सिजनचे कमी प्रमाण यामुळे तेथे परिस्थिती प्रतिकूल असते. अशा ठिकाणी शत्रूंचा सामना करताना सैनिक टाकळीचे शिपाई लिंगाप्पा भाऊ चावरे हे शहीद झाले. त्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून सियाचीन येथे त्यांचे स्मारक आजही पहायला मिळते. 1997 साली आसामसारख्या दुर्गम प्रदेशात बोडो अतिरेक्यांनी धुमाकूळ माजवला होता. बंडखोरांच्या सशस्त्र दलाशी सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तिथे तैनात होते. अतिरेक्यांशी झालेल्या धुमश्चक्रीच्या प्रसंगात टाकळीच्या शशिकांत विठोबा माने यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवाची मोठी अंत्ययात्रा काढली होती.

1998 साली काश्मीर खोर्‍यातल्या पुच्छा जिल्ह्यातील सुरोनकोठमध्ये अतिरेक्यांचे हल्ले होत होते. यावेळी कर्तव्य बजावताना नाईक आनंदराव शामराव पाटील हे शहीद झाले. पुढे 2001 साली काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी फौजेने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यांनी काबीज केलेल्या चौकी परत मिळवताना अनेक भारतीय जवानांनी आपले प्राण गमावले. यात शिपाई अर्जुन मार्तंडा बिरगणे या सुपुत्राला वीरमरण आले.

वीरपुत्रांचे बलिदान देशरक्षणात

सैनिक टाकळीच्या या वीरपुत्रांची गाथा येणार्‍या कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरली. याच वीरपुत्रांच्या बलिदानातून निर्माण झालेला देशरक्षणाचा अग्नी कायम धगधगता राहिला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही काळात देशकार्यासाठी शहीद झालेल्या या 18 जवानांचे स्मरण व्हावे म्हणून गावात अमर जवान स्मारक उभारले आहे. 'कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाळं, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल..' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी गावाला तंतोतंत लागू पडतात. देशातील प्रत्येक प्रांतात टाकळीच्या सुपुत्रांनी कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे सैनिक टाकळी गाव संपूर्ण देशाचे प्रेरणास्थळ बनले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news