चंद्रकांत पाटील होणार पीडब्ल्यूडी व सहकारमंत्री | पुढारी

चंद्रकांत पाटील होणार पीडब्ल्यूडी व सहकारमंत्री

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खात्याची धुरा सोपविली जाणे शक्य आहे. यापूर्वी त्यांनी काहीकाळ सहकार खात्याची धुरा वाहिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या भागातील ते लोकप्रतिनधिी आहेत.

थेट मुद्द्याला हात घालण्याच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांशी थेट पंगा घेतला होता. आताही सहकार खाते त्यांच्याकडे आल्यास ते काँगेस राष्ट्रवादीच्या विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वाला लगाम घालू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे सहकार खाते सोपवले जाण्याची शक्यता आहे. सहकार खात्याबरोबरच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सोपविले जाण्याची शक्यता आहे. याही खात्याचा कामकाज त्यांनी पूर्वी पाहिले आहे.

भाजपने 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. या दोन मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय अलिकडेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवस बारामतीचा दौरा करणार आहेत. भाजपसाठी मिशन 2024 हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी नियोेजन केले आहे. मात्र याला महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र बर्‍याच ठिकाणी टक्कर देऊ शकते. स्थानिक पातळीवर सहकाराच्या माध्यमातून असलेले नेते तसेच जिल्हा बँकेपासून ते गाव पातळीवरील सोसायट्यांमार्फत आर्थिक नाड्या नेत्यांच्या हाती असातात. दूध संघांच्या माध्यमातून खूप गोष्टी नियंत्रित करता येतात. त्यामुळे या ग्रामीण अर्थकारणाच्या नाड्या हातात असलेल्या सहकार क्षेत्राला काबुत ठेवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे खोलवर रूजली आहेत. पाटील याच भागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे या सगळ्या कारभाराची त्यांना उत्तम जाण आहे. याचा वापर करून ते भाजपचा विजयाच मार्ग अधिक प्रशस्त करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार याची खात्री भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या पाठिंब्याने ते भाजपच्या विजयासाठी सहकार खात्याच्या माध्यमातून योग्य प्रकारे या सगळ्या कारभारावर नियंत्रण ठेऊ शकतील, असे सांगितले जाते.

Back to top button