कोल्हापूर : पूर क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना | पुढारी

कोल्हापूर : पूर क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी सुरूच आहे. पंचगंगा नदीतील पाणी पातळी इशारा पातळी गाठत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पूर येणार्‍या भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत. संबंधितांच्या ठिकठिकाणी पर्यायी व्यवस्थाही महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

पंचगंगा पात्राबाहेर पडल्याने जामदार क्लब, शुक्रवार पेठ आणि सुतारवाडा येथे जाऊन अग्निशमन दक्षता पथकाने तेथील नागरिकांना पाणी पातळी वाढत असल्याने स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. राजारामपुरी विभागीय कार्यालय (क्र. 3) अंतर्गत पुराच्या पाण्यामुळे बाधित होणार्‍या भागातील नागरिकांसाठी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ व व्यापारी पेठेतील शाळेत पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी साफसफाई करण्यात आली असून, संडास-बाथरूमची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. हॉलमधून खाली पाणी गळू नये म्हणून पत्र्यावर ताडपत्री टाकण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 2) अंतर्गत पुरावेळी नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी निवारा केंद्र तयार ठेवण्यात आलेले आहे.

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे. अग्निशमन दलाची तीन पथके चोवीस तास कार्यरत झाली आहेत. कसबा बावड्यातील उलपे मळा, सुतारवाडा, सिद्धार्थनगर, लक्षतीर्थ व शहराच्या इतर ठिकाणी जवान फिरत आहेत. एकेका पथकात सहा जवान आहेत. या पथकात स्टेशन ऑफिसर, लीडिंग फायरमन आणि चार जवानांचा समावेश आहे. अग्निशमन दलाने एक डंपर, एक जेसीबी, बोट नेण्यासाठी एक ट्रॅक्टरही तैनात ठेवले आहेत.

Back to top button