कोल्हापूर : कुंभोजमधील बेपत्ता तरुण अक्कलकोटमध्ये सापडला | पुढारी

कोल्हापूर : कुंभोजमधील बेपत्ता तरुण अक्कलकोटमध्ये सापडला

हातकणंगले ; पुढारी वृत्तसेवा : खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून कुंभोज येथील बेपत्ता संदीप नंदकुमार सपकाळ या 33 वर्षीय तरुणाला तब्बल 28 दिवसांनी अक्कलकोट येथून घरी आणण्यात आले. त्याची मन:स्थिती ठीक नसली तरी तो घरी आल्याने नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत होते. मात्र, त्याने खासगी सावकारांच्या विरोधात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीचा व त्यासंबंधी सावकारांबाबत पोलिस काय कारवाई करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संदीप शेतकरी असून, त्याने वैयक्तिक कारणासाठी खासगी सावकारांकडून गरजेनुसार रक्कम कर्जाऊ घेतली होती. घेतलेल्या कर्जाची रक्कम भरमसाट व्याजाने वाढत गेल्याने संदीपला परतफेड करणे कठीण झाले होते. याशिवाय सावकारांनी तगादा लावल्याने चिठ्ठी लिहून संदीप घरातून बेपत्ता झाला होता. याबाबतची वर्दी देण्यासाठी संदीपचे नातेवाईक 13 जुलै रोजी हातकणंगले पोलिस ठाण्यात गेले असता त्यांची पोलिसांनी दाद न घेतल्याने नातेवाईकांनी जिल्हा पोलिस प्रमुखांचा दरवाजा ठोठावला होता.

दरम्यान, संदीपच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली; परंतु संदीप सापडला नव्हता. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. दोन दिवसांपूर्वी संदीपने अक्कलकोटमधून नातेवाईकांना फोन केल्याने नातेवाईक त्याला अक्कलकोटमधून घेऊन आले आहेत. संदीपची मन:स्थिती ठीक नसल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Back to top button