‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार! | पुढारी

‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!

कोल्हापूर : अनिल देशमुख : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. राजाराम बंधार्‍यावर जलसंपदा विभागाने सेन्सर बसवला आहे. त्याची चाचणी घेतली जात असून, लवकरच तो कार्यान्वित केला जाणार आहे. त्याद्वारे प्रत्येक क्षणाची पाणी पातळी (वॉटर लेव्हल) ऑनलाईन जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूरची पूरस्थिती आणि पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍याची पाणी पातळी हे समीकरण आहे. राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळीवरूनच कोल्हापूरची पूरस्थिती निश्चित होत असते. यामुळे प्रशासकीय पातळीसह नागरिकांनाही राजाराम बंधार्‍यावरील पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत सातत्याने देवाण-घेवाण करावी लागते.

राजाराम बंधार्‍यावर जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी पातळीचे मार्किंग केले आहे. त्यानुसार दर तासाला बंधार्‍याची पाणी पातळी किती आहे, याची माहिती जलसंपदा विभागाला दिली जाते. यानंतर जलसंपदा विभागाकडून ती जिल्हा प्रशासनाला दिली जाते. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने पाणी पातळी प्रसिद्ध केली तर अथवा या कार्यालयात दूरध्वनी करून नागरिकांना पाणी पातळीची माहिती घ्यावी लागते. आता मात्र तशी परिस्थिती राहणार नाही.

राजाराम बंधार्‍यावर सेन्सर बसविण्यात आला आहे. त्याची चाचणी घेण्याचे काम सध्या सुरू आहे. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा सेन्सर जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळाशी जोडला जाणार आहे. यामुळे जलसंपदा विभागाच्या त्या संकेतस्थळावर जाऊन त्यावेळीची पाणी पातळी समजणार आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीची नेमकी आणि योग्यवेळी माहिती मिळाल्यास त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

Back to top button