अतिवृष्टी मदत : कोल्हापूर जिल्ह्यातील मागील वर्षीची अतिवृष्टी मदत हवेतच! | पुढारी

अतिवृष्टी मदत : कोल्हापूर जिल्ह्यातील मागील वर्षीची अतिवृष्टी मदत हवेतच!

कोल्हापूर ; संतोष पाटील : कोल्हापूर जिल्ह्यात मागील वर्षाची अतिवृष्टी मदत अद्यापही मिळालेली नाही. जिल्ह्यात मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी उसासह भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी आणि ज्वारी अशा 3,93,000 हेक्टरपैकी सुमारे 5000 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तीन-तीन वेळा पंचनामे झाल्यानंतरही अतिवृष्टी मदत मिळाली नाही.

2020 च्या जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टीने जेरीस आणले. ऑगस्ट महिन्यात नदीला पूर आला. त्यावेळी सुमारे सातशे हेक्टर पिकांवर पाणी पडले. पुन्हा 10 ते 16 ऑक्टोबर 2020 दरम्यान भात, ऊस, भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला, ज्वारी, फुलपिके, उडीद, नाचणी पिकांच तब्बल 3,336 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

गतवर्षी 404 गावांतील 24 हजार 951 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. राधानगरी तालुक्यात पाच हजार 791, तर चंदगड तालुक्यातील 13 हजार शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा दणका बसला होता.

करवीर तालुक्यात 866, पन्हाळ्यात 1301, शाहूवाडीत 1586, हातकणंगले 613, शिरोळमध्ये 1026, गडहिंग्लज 600, आजरा 132, भुदरगडमधील 35 शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.

अतिवृष्टीत करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यातही भात, सोयाबीन व ऊस जमीनदोस्त झाले. काढणीला आलेले भुईमूग, भात आणि सोयाबीन शेतातच कुजले.

या अतिवृष्टी नुकसानीच्या पंचनाम्याचे सोपस्कर पूर्ण झाले. मदतीची घोषणाही झाली. मात्र, ती प्रत्यक्षात आलीच नाही. यंदाही महापुराने बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

तीन वेळा झाले नुकसान

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, तहसीलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकार्‍यांकडून पंचनामे केले. मागील वर्षात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला होता.

नुकसानीची वस्तुस्थिती
बाधित गावे           404      

बाधित शेतकरी     24,591

भात                    1970

ऊस                    556

भुईमूग                  216

सोयाबीन               95

भाजीपाला            225

ज्वारी                  10

फुलपिके              30

उडीद                 2

नाचणी             163

इतर           67

Back to top button