

कोल्हापूर : अनिल देशमुख : पावसाचे आणि पुराचे पाणी यामुळे ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांमधून कोअर नेटवर्कमधील रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. पावसातही हे रस्ते सुस्थितीत राहतील, याद़ृष्टीने विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. याकरिता राज्य शासनाने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
राज्यात गेल्या चार-पाच वर्षांत जोरदार पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ज्या भागात कधी नदी-नाले दुथडी भरून वाहत नाहीत, तिथे महापूरसद़ृश परिस्थिती निर्माण होत आहे. अचानक होणारा मोठा पाऊस, त्यामुळे वेगाने वाढणारी पाणी पातळी आणि त्याचा रस्त्यांवर विशेषत: पुलांना जोडणार्या रस्त्यांवर होणारा परिणाम, यामुळे रस्ते वाहून जाणे, तुटून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात आणि विशेषत: पुलांना जोडणार्या ठिकाणी, अशी परिस्थिती अधिक प्रमाणात आढळून येत आहे. पुलांना जोडणारे रस्तेच वाहून गेल्याने संपर्क तुटतो. यामुळे पुलांचा मूळ उद्देशच सफल होत नाही. यामुळे पुलांना जोडणारे रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मोठा पाऊस झाल्यानंतर पाणी वाहून जाणार्या ठिकाणांत (वॉटर वे) मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा, झाडेझुडपे अडकून पडतात, त्यामुळेही पाणी वाहून जाण्याला मर्यादा येतात. परिणामी, पाणी आजूबाजूला पसरते. त्यातून रस्ता खराब होण्याचे प्रमाणही वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लहान-मोठ्या पुलांना जोडणार्या रस्त्यांच्या तसेच ज्या ठिकाणांहून पाणी वाहून जाते, त्या ठिकाणी असणार्या डिझाईनमध्ये (संकल्पना) बदल करावा का, असा विचार राज्य शासन सध्या करत आहे. याकरिता समिती स्थापन केली आहे.
…याबाबत होणार अभ्यास
अचानक होणार्या पावसाने रस्त्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पाणी वेगाने वाहून जाईल, याकरिता पुलांना जोडणार्या ठिकाणी रस्त्यांचा आकार बशीच्या आकारासारखा (काटछेद) असावा का, याबाबत समिती अभ्यास करणार आहे. यासह पाणी साचणार नाही, ते 'वॉटर वे'मधून वाहून जाईल, यासाठीही उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. याबाबतचा अहवाल समितीला 15 दिवसांत सादर करावा लागणार आहे.