

शिरोली एमआयडीसी (कोल्हापूर) ; पुढारी वृत्तसेवा कॅबिनेट मंत्रीपद देतो म्हणून आमदारांकडे शंभर कोटींची मागणी करणाऱ्या शिरोलीच्या रियाज शेखने तुरुंगातून जामीन मिळताच सुटून शिरोलीत घरी येताना रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावर रोड शो, फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत स्टंटबाजी केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, १७ जुलै २०२२ रोजी मुंबई येथील हॉटेल ओबेरॉय येथे एका राष्ट्रीय पक्षातील आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणातील टोळीला अटक केली होती. या टोळीचा मुख्य सुत्रधार पुलाची शिरोली (ता.हातकणंगले) येथील रियाज अल्लाबक्ष शेख (वय.४१, रा जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ) हा होता. त्याचे इतर तीन साथीदार योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, रा. पाचपाखाडी- ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, रा. पोखरण रस्ता- ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय ५३, रा. नागपाडा मुंबई) असे होते. एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेने या चार जणांना १७ जुलै २०२२ रोजी अटक केली होती.
यातील मुख्य सुत्रधार शिरोलीचा रियाज शेख याची जामिनावर सुटका झाली होती. तो दि. २ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या वाजण्याच्या सुमारास शिरोलीत आला. महामार्गा लगतच शंभर मिटरवर रियाज शेखचे घर आहे. रात्री अकरा वाजता घरी येताना एखादे मोठे युध्द जिंकून, मोठा पराक्रम केल्याप्रमाणे किंवा कुस्तीचे मैदान जिंकल्या सारखे त्याने आलीशान चारचाकी गाडीच्या बॉनेटवर बसुन रोड शो केला. यावेळी त्याच्यावर फुलांची उधळण करण्यात आली इतकेच काय त्याच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करत मोठी स्टंटबाजी करण्यात आली. या सर्व स्टंटबाजीचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला.
शुक्रवारी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला व्हिडिओ मिळाला असता, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय बोर्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, सागर पाटील यांनी रियाज शेखला शुक्रवारी रात्री आठ वाजता घरातून अटक केली. या रोड शो मध्ये सहभागी झालेल्या युनुस अजीज शेख, मतिन शब्बीर महात, सिकंदर नुरमंहमद कवठेकर व रशीदा अल्लाबक्ष शेख यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पाटील करीत आहेत.
तुरुंगातून जामिनावर सुटुन आल्यावर रोड शो करून फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केलेला व्हिडिओ व्हायरल करून व्हिडिओ खाली आय एम बॅक, मैं हूं डॉन गाणे लावून व्हिडिओ व्हायरल केला आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे शंभर कोटींची मागणी करुन रियाजचा मोठा हात मारण्याचा डाव फसला आणि पोलीसांच्या जाळ्यात सापडला.
हेही वाचा :