अजून अडीच वर्षे शिल्लक, पण त्यांना निवडणुकीची घाई : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मी आतापर्यंत सहा निवडणुका लढवल्या. येणारी माझी सातवी निवडणूक आहे. त्याला अजून अडीच वर्षे आहेत, पण त्यांना फारच घाई झाली आहे, अशा शब्दात आमदार हसन मुश्रीफ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना टोला लगावला.
मुश्रीफ म्हणाले, अजून निवडणुकीला अडीच वर्षे आहेत. त्यांना अडचण काय आहे, नुसतेच बोलायचे कशाला, जनतेचा काय राग आहे ते बघू, जनतेचा जो कौल असेल तो आम्हालाही मान्य आहे, असे सांगत विक्रमसिंह घाटगे यांच्याविरोधात सदाशिवराव मंडलिक निवडणुकीला उभारले तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणायची, राजाला दोन खून माफ असतात, तू कशाला उभा राहतोस. आता मी ही घाबरलो, अशा शब्दात मुश्रीफ यांनी घाटगेंना उपहासात्मक टोला लगावला. घाटगे यांचा आभारी आहोत, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज केले, यामुळे मला पुन्हा नव्याने रिचार्ज करावे लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुश्रीफ मुंबईला मलिक यांना सोडवण्यासाठी फेर्या मारत होते, या आरोपावर केडीसीचे संचालक भैया माने म्हणाले, केवळ जातीयवादातून घाटगे असा आरोप करत आहेत. मुश्रीफ मंत्री होते, ते मुंबईला जाणार नाहीत तर कोठे जाणार? आमचे रक्त, विचार याची भाषा करता, मग कागलातील शाहूंच्या पुतळ्याचे भूमिपूजन झाले, त्याला स्थगिती का दिली? साखर कारखान्यातील अनेक कामांसाठी कमिशन घेतले जात असल्याचे ते बोलतात.
प्रकाश गाडेकर म्हणाले, घाटगे यांनी एक दूध संघ काढला होता. तो विकून खाल्ला. त्याची गाडी घाटगे यांची पत्नी वापरत होती. कोट्यवधीचे स्क्रॅप कोणत्याही टेंडरविना विकले, असा आरोपही त्यांनी केला.