हातकणंगले : जि.प.च्या नवीन रचनेने इच्छुकांच्या आशेवर पाणी | पुढारी

हातकणंगले : जि.प.च्या नवीन रचनेने इच्छुकांच्या आशेवर पाणी

हातकणंगले : पोपटराव वाकसे : हातकणंगले तालुक्यातील प्रभाग रचनेच्या हरकतींबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असतानाही प्रशासनाकडून नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत पार पडली होती. त्यानंतर इच्छुकांनी कंबर कसून रणनीतीला सुरुवात केली असतानाच मंत्रिमंडळात पुन्हा 2017 च्या रचनेप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

नव्याने करण्यात आलेल्या रचनेत 12 जिल्हा परिषद गट व 24 पंचायत समिती गण झाले होते. ते आता पुन्हा 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समितीचे गण होणार आहेत. मात्र, हुपरी व हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यामुळे प्रभाग रचना करताना राजकीय ताकद पणाला लावून मतदारसंघाची निर्मिती केली जाणार आहे. परिणामी, अनेकांच्या इच्छा-आकांक्षावर पाणी फिरणार आहे.

तालुक्यात 62 गावे असून, 59.8.8 चौ.कि.मी. क्षेत्रफळ आहे. 7 लाख 9 हजार 628 लोकसंख्या असून, पेठवडगाव व इचलकरंजी या दोन नगर परिषदा आहेत. अडीच ब्लॉकचा तालुका असून, दोन विधानसभेचे मतदारसंघ आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार 2017 च्या रचनेनुसार

घुणकी, भादोले, कुंभोज, हातकणंगले, शिरोली, रुकडी, कोरोची, कबनूर पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ असे जि.प.चे मतदारसंघ कार्यरत होते. परंतु नवीन शासकीय निर्णयानुसार गट व गण मतदारसंघात वाढ केल्याचे जाहीर केल्यामुळे नवीन प्रभाग रचना व आरक्षण जाहीर केले. यामध्ये घुणकी, भादोले, कुंभोज, टोप, शिरोली, हेरले, रुकडी, कोरोची, कबनूर, चंदूर, पट्टणकोडोली व रेंदाळ असे 12 गट व24 गणांची निर्मिती झाली होती. आघाडी सरकारने 17 टक्के वाढीव लोकसंख्या गृहीत धरून रचनेत बदल केल्याने सदस्य संख्याबळही वाढले होते. त्यामुळे तालुक्यात टोप, हेरले व चंदूर हे गट नव्याने निर्माण झाले आहेत याशिवाय वाढीव पंचायत समिती गणही अस्तित्वात आले होते.

या नवीन प्रभाग रचना भौगोलीकदृष्ट्या अनकूल नसल्याचा निर्वाळा देत आमदार प्रकाश आवाडे, माणगांवचे सरपंच राजू मगदूम, अजिंक्य इंगवले यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2017 च्या रचनेनुसार जि.प. च्या निवडणुका होणार असल्याचा निर्णय घेऊन नवीन करण्यात आलेली रचना ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात 2017 च्या रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. प्रभाग रचनेच्य लोकसंख्येत तीन ते चार हजारांची वाढ होणार असून पुन्हा नव्याने आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे इच्छूकांच्या आशेवर पाणी फिरले जाणार आहे.

मंडळांच्या आशेवर विरजण पडणार

समोर आलेल्या गणेशोत्सवामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार होता. परंतु, मंत्रिमंडळाच्या बदललेल्या निर्णयामुळे प्रभाग रचना व आरक्षणामध्ये बदल होणार आहे. याशिवाय या प्रक्रियेला खूपच वेळ लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधी पूर्ण होणार असल्याने मंडळांचा आर्थिक पुरवठा कमी प्रमाणात होणार असल्याने मंडळांच्या आशेवर विरजण पडणार आहे.

Back to top button