80 टक्के नागरिक पितात विषारी पाणी | पुढारी

80 टक्के नागरिक पितात विषारी पाणी

कोल्हापूर : राजेंद्र जोशी : भारतात 80 टक्के नागरिकांना विषारी धातूयुक्त पाणी प्यावे लागत आहे. या पाण्यातील विषारी घटकद्रव्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता भारताच्या सार्वजनिक आरोग्यापुढे मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाणीपुरवठ्याची सर्वस्वी जबाबदारी असलेल्या देशातील राज्य सरकारांनी सतर्क होऊन त्यावर गांभीर्याने व तातडीने उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत. अन्यथा, नजीकच्या काळात भारतीयांवर विषारी पाणी पिण्यावाचून पर्याय राहणार नाही.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नुकताच राज्यसभेमध्ये याविषयी एक अहवाल सादर केला. या अहवालात देशातील मोठ्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिकांसारख्या माध्यमांचा आधार घ्यावा लागत असल्याकडे निर्देश केला आहे. नागरिकांच्या शरीरामध्ये पाण्यातून दररोज आर्सेनिक, आयर्न, लेड, कॅडमियम, क्रोमियम आणि युरेनियम अशा धातूंचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात जाते आहे. यामुळेच त्वचारोग, कर्करोग, अल्झायमर, पार्किन्सन्स, मूत्रपिंडाचे विकार, चेतासंस्थेचे विकार अशा गंभीर आजारांनी नागरिकांना ग्रासण्यास सुरुवात केली आहे.

देशाच्या विविध भागांतील सुमारे 30 टक्के नागरिकांना प्रतिवर्षी महापूर अनुभवावयास येतो. भारत हा सर्वाधिक धरणांचा देश आहे. पाणीपुरवठा ही सर्वस्वी राज्यांची जबाबदारी आहे आणि नेमक्या याच प्राथमिक जबाबदारीच्या परीक्षेत बहुतांश राज्ये नापास झाली आहेत.

209 जिल्ह्यांत आर्सेनिकचे प्रमाण जास्त

अहवालात देशातील विषारी धातूयुक्त पाण्याने ग्रासलेल्या जिल्ह्यांची व प्रदेशांची समग्र माहिती आहे. देशातील 25 राज्यांतील 209 जिल्ह्यांमध्ये कर्करोगाला आमंत्रण देणार्‍या आर्सेनिक या धातूचे पाण्यातील प्रमाण प्रतिलिटर 0.01 मिलिग्रॅमच्या वर गेले आहे. 29 राज्यांतील 491 जिल्ह्यांतील काही भागांत पाण्यातील लोहाचे प्रमाण प्रतिलिटर 1 ग्रॅमहून अधिक, 11 राज्यांतील 29 जिल्ह्यांमधील काही भागांत भूगर्भातील पाण्यामध्ये कॅडमियम या अतिविषारी धातूचे प्रमाण प्रतिलिटर 0.003 मिलिग्रॅम, तर 16 राज्यांतील 62 जिल्ह्यांमध्ये पाण्यातील क्रोेमियम या धातूचे प्रमाण प्रतिलिटर 0.05 मिलिग्रॅ्रम इतके झाले आहे. याखेरीज देशात 18 राज्यांतील 152 जिल्ह्यांमधील काही भागांत युरेनियम या धातूचे पाण्यातील प्रमाण प्रतिलिटर .03 मिलिग्रॅम आढळून आले आहे.

Back to top button