कोल्हापूर : 'टाेपी'वरुन खुनी जाळ्यात : चिंचवाड खून प्रकरणाचा ७२ तासांत छडा | पुढारी

कोल्हापूर : 'टाेपी'वरुन खुनी जाळ्यात : चिंचवाड खून प्रकरणाचा ७२ तासांत छडा

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील नंदीवाले वसाहतीमधील चंपाबाई भूपाल ककडे (वय ६५) या महिलेचा साडीने गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री सुमारे साडे नऊच्या सुमारास घडली होती. त्यानंतर शिरोळ पोलिसांनी तपासासाठी मोठी यंत्रणा लावली असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ७२ तासांत या खुनाचा छडा लावण्यात यश मिळवले. या खून प्रकरणाची प्रकाश लक्ष्मण नंदीवाले (वय ३३) याने पाणी मागून घरात घुसून महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे.  हा गुन्हा उघडकीस आणल्याप्रकरणी तपास पथकाला पोलीस अधीक्षक यांच्याकडून १० हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.३०) रात्री खून करून महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या घटनेमुळे चिंचवाड परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देवून शिरोळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिरोळ पोलिसांनी परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत रेकॉर्डवरील असलेल्या गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू केली होती. मात्र, त्यांना यश मिळत नव्हते.

‘टाेपी’वरुन काढला आराेपीचा माग   

 स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या खुनाच्या तपासासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. खून झालेल्या ठिकाणी एक टोपी मिळून आली होती. या टोपीवरून या मार्गावरील व वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासन्यात आले होते. यात सापडलेल्या टोपीप्रमाणे संशयित मोटरसायकलवरून दिसून आला होता. हा तरुण चौंडेश्वरी सुतगिरणीवरून शिरोळ मार्गाने जात असताना मंगोबा मंदिराजवळ गुन्हे अन्वेषण पथकाने त्याला थांबवले. गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता खुनाच्‍या गुन्‍ह्याचा उलगडा झाला.

पाणी मागण्‍याच्‍या बहाणा करत घरात घुसला

ककडे यांच्या मळ्याच्या परिसरात वृध्द पती, पत्नी दोघेच घरी राहत असल्याची माहिती होते. या घराच्या परिसरात दोन दिवस रेकी करून शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घरात पाणी मागण्याचा बहाणा करून घरात गेला.  चंपाबाई ककडे यांनी प्रकाश नंदीवाले यांना पाणी दिले.  पाणी पिऊन झाल्यावर अचानकपणे चंपाबाई यांच्यावर झडप घालून खाली पाडले. व त्यांचा गळा दाबून खून केला. व अंगावरील दागिने काढून घेवून मोटरसायकलने पसार झाल्याची कबूली प्रकाश नंदीवाले दिली आहे.

पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, आसिफ कलायगार, अनिल पास्ते, रणजित कांबळे, नामदेव यादव, उत्तम सडोलीकर यांच्यासह कर्मचार्‍याच्या पथकाला जिल्हा पोलीस प्रमुखांनी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या तपास कामी डीवायएसपी रामेश्वर वैजाने, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button