कोल्हापूर : मैदान लांब; पण उमेदवारीची चर्चा

कोल्हापूर : मैदान लांब; पण उमेदवारीची चर्चा

कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे : भाजपने कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्याचे भाजपच्या नेत्यांनी जाहीर केल्यामुळे उमेदवार कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.

2024 चे मैदान अद्याप लांब असले, तरी उमेदवारीची तयारी करावी लागणार आहे. मुळात कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांतून भाजपला लोकसभेसाठी यश मिळालेले नाही. या मतदारसंघांतून भाजपने दोन अपवाद सोडले, तर निवडणूक लढविलेली नाही. भाजप-शिवसेना युती असल्याने नेहमीच या जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या. आता शिवसेनेचे खासदार या दोन्ही मतदारसंघांतून निवडून आले असले, तरी ते दोघेही आता शिंदे समर्थक आहेत. त्यापैकी संजय मंडलिक यांनी आपण शिंदे गटात प्रवेश केला, असे स्पष्ट न सांगता लोकसभेतील गटनेता निवडीपुरती आपली भूमिका मर्यादित होती, असे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाला वेगळे महत्त्व आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे सुभाष वोरा यांनी 1991 साली, तर गणपतराव सरनोबत यांनी 1996 साली लोकसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविली होती. वोरा यांना 40 हजार 7, तर सरनोबत यांना 1 लाख 25 हजार 667 मते मिळाली होती. त्यानंतर भाजपने थेट मैदानात आपले बळ अजमावलेले नाही. त्यानंतर 2014 साली राजू शेट्टी यांनी भाजपचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढविली होती. त्यांच्या प्रचारासाठी तेव्हा गुजरातचे तत्कलीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आले होते. त्यानंतर शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेतली. 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

निवडणुका अजून लांब आहेत. तोवर राजकीय परिस्थिती कशी असणाार? जिल्ह्यातील राजकीय वातावरण कसे तयार होणार? स्थानिक स्वराज्य संस्थांत कोण बाजी मारणार? यासारखे असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातच सत्तेचा पुढचा पट मांडला जाणार आहे.

आज राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार आहे. शिवसेनेचे संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी शिंदे गटाशी जुळवून घेतले आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेता निवडीत या दोघांचेही समर्थन शिंदे गटाला होते. आता शिंदे गटातून या दोघांंना लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार की भाजपकडून त्यांना लढावे लागणार, हे अद्याप स्पष्ट नाही. भाजपने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे ठरविल्यास कोल्हापुरातून धनंजय महाडिक त्यांचे उमेदवार असू शकतात. तसेच हातकणंगलेतून राहुल आवाडे यांना भाजप रिंगणात उतरवू शकतो. याचबरोबर आणखी वेगळी नावे ऐनवेळी इलेक्टिव्ह मेरिट म्हणूनही पुढे येऊ शकतात. त्यामुळे उमेदवार कोण? याचे उत्तर येणारा काळ देणार असला, तरी भाजपने या दोन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्याने उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील 16 जागा 'टार्गेट'

भाजपने राज्यातील ज्या 16 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामध्ये कोल्हापूर व हातकणंगले या दोन लाकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांत आता केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचला की नाही, याची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारचे मंत्री या दोन्ही मतदारसंघांत संपर्क ठेवून माहिती घेणार आहेत. आता प्रत्यक्ष लढती लांब असल्या, तरी त्यासाठी जोडण्या आतापासूनच कराव्या लागणार आहेत. त्यासाठी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news