गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे | पुढारी

गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे

आजरा : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसैनिक यांनी गद्दार आमदार-खासदार यांना अपेक्षेपेक्षा जास्त दिले. मात्र, त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. या आमदार-खासदारांना जरा तरी लाज असेल, तर त्यांनी पदाचा राजीनामा देवून परत निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. ते आजरा येथील संभाजी चौकात निष्ठा यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, आदेश बांदेकर, अरूण दुधवडकर, विजय देवणे, संभाजी पाटील उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर यांना सुमारे ५६७ कोटीचा निधी दिला. पण ते चुकीचे वागले. कोणतेही दडपण असू शकते, पण स्वतःसाठी आमदारांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची वाटचाल समृध्दीच्या दिशेने सुरू होती. उध्दव ठाकरे कोरोना काळात महाराष्ट्राची काळजी करीत होते. त्यातच ते आजारी देखील होते. मात्र, त्याचवेळी ४० आमदार कटकारस्थाने करीत होते. ही प्रवृत्ती ठेचायला पाहिजे. सध्या राज्यात तात्पुरते राजकीय नाट्य सुरू आहे. आगामी दोन महिन्यात राज्यातील सरकार कोसळेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button