

कोल्हापूर : गौरव डोंगरे : 'व्हॉटस्अॅपकडून पाच देशांतून काढलेल्या लकी ड्रॉमधून आपला नंबर निवडला आहे. तुम्हाला पंचवीस लाखांची लॉटरी असून आमचा नंबर सेव्ह करून व्हॉटस्अॅप कॉल करा. मुंबईतून बँकेचे प्रतिनिनी बोलतील त्यांना सर्व माहिती द्या, तुमच्या खात्यात 25 लाख रुपये जमा होतील, अशी बतावणी करत फसवणुकीचा फंडा सुरू आहे. अनेकांच्या व्हॉटस्अॅपवर अशा ऑडिओ क्लिप आल्या आहेत.
'कौन बनेगा करोडपती' या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमाचा लोगो, बच्चन यांचा फोटो वापरून मजकुरासोबत एक ऑडिओ क्लिप मोबाईलवर येते. त्यातील व्यक्ती सांगते की, 'तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉटस्अॅपकडून 25 लाखांची लॉटरी लागली आहे. एक आंतरराष्ट्रीय लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये भारत, नेपाळ, दुबई, जुनान, सौदी अरब यातून तुमचा सीमकार्ड लकी ड्रॉमधून निवडला आहे. तुमचे पैसे मुंबईतील बँकेत आले आहेत. त्यांचा क्रमांक सेंड केला आहे. तो सेव्ह करून त्यांना कॉल करा. फक्त व्हॉटस्अॅप कॉल करा इतर कॉल करू नका. लॉटरी नंबर त्यांना सांगा आणि ते तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करतील… अशी सर्व माहिती हिंदीतून दिली जाते.
फसवणुकीचा फंडा
व्हॉटस्अॅप लॉटरीच्या नावाखाली फसवणुकीचा हा नवा फंडा असून याद्वारे अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधितांनी दिलेल्या क्रमांकावर फक्त व्हॉटस्अॅप कॉल करण्याची अट घातली जाते. इतर कोणत्याही प्रकारे संपर्क करू नका, कारण ही व्हॉटस्अॅप लॉटरी आहे. परंतु यातून फसवणुकीचा उद्देश असून सायबर पोलिसांनीही अशा मॅसेजला कोणताही रिप्लाय न करण्याचा सल्ला दिला आहे.
आमिषाला बळी पडू नका
ऑनलाईन लॉटरी, लष्करी अधिकार्यांची ओळखपत्रे वापरुन फसवणूक, महावितरण कंपनीचे थकीत बिल न भरल्यास वीज तोडणे अशा नावाने फसवणूक करणारे कॉल अनेक नागरीकांना येतात. अशा तक्रारीही सायबर पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून अशी आमिषे दाखविण्यात येत असतील तर त्याला बळी न पडता नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले.