कोल्हापूर : त्र्यंबोली देवीच्या नावानं चांगभलं | पुढारी

कोल्हापूर : त्र्यंबोली देवीच्या नावानं चांगभलं

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : ‘पीऽऽढबाक’सह पारंपरिक वाद्यांचा सूर आणि ‘त्र्यंबोलीच्या नावानं चांगभलं…’चा गजर करत त्र्यंबोली देवी यात्रेची सांगता मंगळवारी झाली. आषाढ महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने दिवसभर पंचगंगेचे नवे पाणी त्र्यंबोली देवीच्या चरणी वाहण्यासाठी वाजत-गाजत नेण्यात आले. यानिमित्ताने टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा शिवदीप गुरव यांनी बांधली होती.

श्रावण महिना अवघ्या दोन दिवसांवर आला असून आषाढ महिन्यातील शेवटच्या मंगळवारी त्र्यंबोली यात्रेची सांगता झाली. सकाळपासूनच महिलांनी नव्या पाण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर गर्दी केली होती. फुलांच्या माळांनी सजविलेल्या घागरी-मडक्यांमधून नदीचे पाणी भरून ते ‘पीऽऽढबाक…’च्या वाद्याच्या गजरात टेंबलाई टेकडीपर्यंत नेण्यात आले.

काहींनी पायी चालवत तर काहींनी वाहनांमधून पाणी नेले. टेंबलाई टेकडीवर त्र्यंबोली देवीसह इतर देवतांच्या चरणी हे पाणी वाहण्यात आले. यानंतर लोकांनी घरांत कोंबडा व मटणाचा नैवेद्य दाखवून सर्वांनी एकत्र बसून नव्या पाण्यापासून बनविलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्र्यंबोली यात्रेच्या शेवटच्या मंगळवारी टेंबलाई टेकडीवर देवीच्या दर्शनासाठी, यात्रेतील खेळण्यांचा आनंद लुटण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

नदीकाठी कोंबड्याचा नैवेद्य

मंगळवारी रात्रीही नदीकाठी परडी सोडण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सहकुटुंब लोकांनी यात सहभाग घेतला. परडी सोडल्यानंतर नदीकाठीच कोंबड्याचा नैवेद्य दाखवून एकत्रित जेवण केले.

Back to top button