कोल्हापूर : आठ नगरपालिकांत 44 जागा मिळणार | पुढारी

कोल्हापूर : आठ नगरपालिकांत 44 जागा मिळणार

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील निवडणुका होणार असलेल्या आठ नगरपालिकांत सुमारे 44 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव राहतील, अशी शक्यता आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच राखीव जागांची संख्या निश्‍चि केली जाणार आहे.

जिल्ह्यातील जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा, पेठवडगाव, मलकापूर, कुरुंदवाड आणि मुरगूड या आठ नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या आठ नगरपालिकांत लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 44 जागा इतर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना मिळणार आहेत. त्यापैकी 24 जागा इतर मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी जातील, अशीही शक्यता आहे.

इतर मागास प्रवर्गाच्या राखीव जागा निश्‍चित करण्यासाठी सूत्र निश्‍चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी आरक्षणाची टक्केवारीही निश्‍चित होणार आहे. त्यानुसार इतर मागास प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर नगरपालिकेत सर्वाधिक 7 जागा राखीव राहतील, अशी शक्यता आहे. त्या खालोखाल गडहिंग्लज आणि कागल नगरपालिकांत प्रत्येकी 6 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पन्हाळा, पेठवडगाव, मलकापूर, कुरुंदवाड आणि मुरगूड या पाच नगरपालिकांत प्रत्येकी 5 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होण्याची शक्यता आहे. या पाचही नगरपालिकांमध्ये या पाच जागांपैकी प्रत्येकी तीन जागा महिलांसाठी राखीव होतील, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम संख्या निश्चित झाल्यानंतर या आठही नगरपालिकांतील नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील संभाव्य स्थिती

नगरपालिका      एकूण जागा      ओबीसी
जयसिंगपूर               26                   7
कागल                    23                    6
गडहिंग्लज                22                   6
पन्हाळा                    20                   5
पेठवडगाव                20                   5
मलकापूर                  20                   5
कुरुंदवाड                 20                    5
मुरगूड                     20                    5

Back to top button