कोल्हापूर : मोबाईल फायनान्सच्या नावाखाली फसवणूक | पुढारी

कोल्हापूर : मोबाईल फायनान्सच्या नावाखाली फसवणूक

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  मोबाईल खरेदीसाठी फायनान्स कंपनीचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक करणार्‍या ‘फायनान्सर’विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. योगेश मधुकर बामणीकर (रा. नाना पाटीलनगर) असे संशयिताचे नाव आहे. कागदपत्रांचा गैरवापर करत विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेत मोबाईलही त्याने परस्पर लाटल्याचे तपासात पुढे आले आहे. याबाबत अमोल शिवाजी पोवार (वय 27) यांनी 1 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

संशयित योगेश बामणीकर याने फिर्यादी पोवार यांना फायनान्सवर नवीन मोबाईल घेऊन देतो असे सांगून 25 एप्रिल 2022 रोजी मिरजकर तिकटी, शाहूपुरी येथील वेगवेगळ्या मोबाईल शॉपीमध्ये फिरवले. फिर्यादी, त्यांची पत्नी व सासू यांची कागदपत्रे घेऊन कर्ज मंजूर करून देतो असे भासवले. या सर्वांच्या नावे कर्जे मंजूर करून तिघांच्या नावाने 5 मोबाईल हॅन्डसेट घेतले. मात्र, यातील कोणतेही मोबाईल फिर्यादीला मिळाले नव्हते.

फायनान्स कंपनीचा तगादा
फिर्यादी पोवार यांच्यासह त्यांची पत्नी, सासू यांच्या नावे कर्जे मंजूर होऊन त्याचे हप्‍ते सुरू झाले. हे हप्‍ते पुढे थकीत दाखविल्याने फायनान्स कंपनीचे दुसरे कर्मचारी त्यांच्याकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. संशयित बामणीकर सध्या पसार झाला असून त्याने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनिक ‘पुढारी’त सर्वप्रथम वृत्त
‘मोबाईल फायनान्सर गायब झाल्याने अनेकजण गोत्यात’ असे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने 16 जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले होते. संशयिताने अशाच प्रकारे आणखी काही जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली असून तक्रारदारांची संख्या वाढणार आहे.

Back to top button