कोल्हापूर : पाचगावच्या व्यक्तीचा स्वाईन फ्लूने, हातकणंगलेत महिलेचा डेंग्यूने मृत्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पाचगाव (ता. करवीर) येथील 66 वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे उपचार सुरू असताना बुधवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात स्वाईन फ्लूबाधित 6 रुग्णांवर शासकीयसह खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
पाचगावच्या रुग्णावर गेल्या आठवड्यापासून स्वाईन फ्लू संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय पथकाडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते; पण प्रकृती साथ देत नव्हती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
15 जुलै रोजी त्यांचा स्वाईन फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पाचगाव परिसरात आरोग्य विभागाने जनजागृती, स्वच्छतेवर लक्ष दिले आहे. तसेच नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
स्वाईन फ्लूबाधित सहा रुग्णांवर उपचार सुरू असून, हे रुग्ण मंगळवार पेठेतील भक्तिपूजानगर, प्रतिभानगर, कुंभोज, रतन मेडिसिटी, निपाणी, तासगाव (सांगली) येथील आहेत.
हातकणंगले : गेल्या काही दिवसांपासून हातकणंगलेमध्ये डेंग्यूने अक्षरशः थैमान घातले असून, रुग्णांची संख्या दोनशे वर गेली आहे. आरोग्य व प्रशासनाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने सौ. मालुताई बंडा कांबळे (वय 57, रा. हातकणंगले) या महिलेचा मंगळवारी रात्री डेंग्यूने मृत्यू झाला. यामुळे नागरिकांतून तीव— संताप व्यक्त होत आहे.
हातकणंगले-इचलकरंजी रस्त्याकडेला खणीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा होत नाही. तसेच शहरात जागोजागी कचर्याचे ढीग साठले आहेत. यामुळे डेंग्यूचा फैलाव वेगाने होत आहे. प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने डासांचा उपद्रव वाढत चालला आहे. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव वेगाने होत आहे.
दरम्यान, सौ. मालुताई कांबळे या काही दिवसांपासून डेंग्यूने आजारी होत्या. त्यांच्यावर इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांत त्यांच्यातील पेशींचे प्रमाण एकदमच कमी होऊन मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
शहरात रुग्ण वाढत असताना प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नाही. नगरपंचायतीकडील फॉगिंग मशिन बंद आहेत.
कचरा उठावाचा ठेका संपल्याने सर्वत्र कचर्याचे प्रमाण वाढले आहे. लवकरच नवीन ठेका दिला जाणार आहे; मात्र त्यासाठी मुख्याधिकार्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने विलंब होत आहे. शहरात सर्वत्र पावडर फवारणी सुरू आहे. नागरिकांनी पाणी गरम करून, गाळून प्यावे.
– फरिदा मुजावर,
सभापती, आरोग्य विभाग नगरपंचायत