कोल्हापूर : बदलत्या राजकारणाने ‘गोकुळ’च्या दुधाला उकळी | पुढारी

कोल्हापूर : बदलत्या राजकारणाने ‘गोकुळ’च्या दुधाला उकळी

कोल्हापूर : विकास कांबळे : बदललेले राजकारण आता जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्येही हळूहळू प्रवेश करू लागले आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देणार्‍या ‘गोकुळ’मध्ये नव्याने राजकीय पट मांडला जात असल्याची चर्चा सुरू आहे. अध्यक्षांच्या सहीचे अधिकार काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे; मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.

जिल्ह्याच्या राजकारणात आ. सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर मात्र आ. पाटील यांनी महाडिक यांचे जिल्ह्यावरील वर्चस्व कमी करण्याकरिता आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. गोकुळमधील त्यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून ते प्रयत्न करत आहेत. परंतु, काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत त्यांना यश आले.

गोकुळमध्ये सत्ता स्थापन करताना आ. सतेज पाटील, आ. हसन मुश्रीफ यांनी खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांना सोबत घेताना त्यांना प्रत्येकी दोन-दोन जागा दिल्या होत्या. आ. मुश्रीफ यांना 3 आणि आ. पाटील यांनी स्वत:ला 7 जागा घेतल्या होत्या. त्यात विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा समावेश आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर गोकुळमध्येही बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.

गोकुळच्या सत्तारूढ आघाडीतील दोन नेते शिंदे गटात गेले आहेत. एक पूर्वीपासूनच भाजपकडे आहेत. एक नेते थेट गेले नसले, तरी ते त्या मार्गावर आहेत. राहिलेले शिंदे गटाकडे थोडे झुकले आहेत. या सर्वांची गोकुळमध्ये नव्याने फेरमांडणी करून भाजप नेत्यांच्या मदतीने गोकुळवर पुन्हा वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून गोकुळचे विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सह्यांचा अधिकार काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. तथापि, याबाबत काही संबंधित नेत्यांशी संपर्क साधला असता या हालचालींच्या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.

वार्षिक सभेनंतर हालचालींना येणार वेग

‘गोकुळ’ची वार्षिक सभा 29 ऑगस्टला आहे. त्यानंतर या हालचालींना वेग येण्याची शक्यता असल्याचे ‘गोकुळ’मधील एका नेत्याने संकेत दिले; मात्र अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Back to top button