विस्कटलेले कुटुंब सावरण्याचे काम ठाकरे यांच्याकडून होत नाही : संजय मंडलिक | पुढारी

विस्कटलेले कुटुंब सावरण्याचे काम ठाकरे यांच्याकडून होत नाही : संजय मंडलिक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : विस्कटलेले कुटुंब सावरण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे; पण तसे होताना दिसत नाही, अशा शब्दांत खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. दरम्यान, मंडलिक व खासदार धैर्यशील माने लवकरच शिंदे गटात दाखल होत असून, मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमवेत होणार्‍या बैठकीत माने आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

मंडलिक व माने नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह शिवसेनेचे लक्ष लागलेे आहे. शिवसेनेच्या मेळाव्यालाही ते अनुपस्थित होते. मंडलिक गटाच्या मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी शिंदे गटाकडे जाण्याचा आग्रह धरला. सत्तेच्या बाजूने गेलो, तर आपल्याला विकासकामांसाठी निधी आणता येईल, अशी भूमिका तेथे मांडण्यात आली.

महाविकास’चा फायदा मित्रांनाच; मंडलिकांची स्थानिक नेत्यांवर टीका

या मेळाव्यावेळी संजय मंडलिक दिल्लीत होते. त्यांनी या मेळाव्यानंतर नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीशी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग पहिल्यांदा कोल्हापुरातच झाला होता, हे खरं आहे; पण सत्तेचा फायदा शिवसेनेपेक्षा आमच्या मित्रांना अधिक झाला. ज्यांच्या विरोधात मी लढलो ते दुसर्‍या बाजूने आहेत. त्यांचे काय होणार, याचा विचार करावा लागेल. उद्धव ठाकरे हे मला माझ्या भावाप्रमाणे आहेत. विस्कटलेले कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आहे; पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. ‘मातोश्री’ किंवा कुठल्याही ज्येष्ठ नेत्याने माझ्याशी अद्याप बोलण्याचा प्रयत्न केलेला नाही. लवकरच आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंडलिक सध्या दिल्लीत असून, ते सातत्याने आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांशी संपर्कात आहेत. पुढील राजकीय वाटचालीसाठी ते स्थानिकांशी चर्चा करीत असल्याचे समजते.

Back to top button