महाविकास आघाडीच्या काळात काहीच कामे करता आली नाहीत : धैर्यशील माने | पुढारी

महाविकास आघाडीच्या काळात काहीच कामे करता आली नाहीत : धैर्यशील माने

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : खासदार धैर्यशील माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल होणार, हे जवळपास निश्चित आहे. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिल्ली येथील बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सोमवारी शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली, या बैठकीला माने उपस्थित होते, असे सूत्रांकडून समजते. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय दिशा स्पष्ट दिसते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मंगळवारच्या दिल्ली दौर्‍याला महत्त्व आले आहे.

इचलकरंजी महापालिकेच्या फाईलवर गुवाहाटीत सही

धैर्यशील माने यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. इचलकरंजी महापालिकेच्या फाईलवर तत्कालीन नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत सही केली. पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या एका निवेदनावर तत्काळ निर्णय केला. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे, असा दावा करण्यात आला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद मिटावा, यासाठी महिनाभर प्रयत्न करीत होतो. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचेही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. आपण परिस्थितीचे बळी आहोत. दुर्दैवाने ही वेळ कोणाच्याही राजकीय आयुष्यात येऊ नये, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

भावनेने आपण पक्षप्रमुखांसोबत आहे. शिंदे यांनी शिवसेना सोडलेली नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या काळात काहीच कामे करता आली नाहीत. आमदार, खासदारांना काहीच निधी मिळाला नाही. सत्ता नसेल तर राहिलेली दोन वर्षे काहीच करता येणार नाहीत. नाइलाजास्तव प्रवाहासोबत जाण्यावाचून पर्याय नाही. या क्लिपमुळे अप्रत्यक्षरीत्या शिंदे गटाबरोबर जाण्याची पुढील राजकीय वाटचालीची दिशा दाखवून दिली आहे.

Back to top button