कोल्हापूर : नवग्रह मंदिराच्या चबुतर्‍यावरील होळकरांची राजमुद्रा खोडण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : नवग्रह मंदिराच्या चबुतर्‍यावरील होळकरांची राजमुद्रा खोडण्याचा प्रयत्न
Published on
Updated on

कोल्हापूर : श्रीराम ग. पचिंद्रे : श्री अंबाबाईच्या प्राकारातील घाटी दरवाजालगत असणार्‍या नवग्रह मंदिराच्या चौथर्‍यावर सोंड उंचावलेल्या दोन हत्तींच्या शिल्पकृतींच्या मधोमध एकाच ठिकाणी संगमरवरात कोरलेली अडीच इंच व्यासाची एक राजमुद्रा आहे; ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची राजमुद्रा असून त्यावरील अक्षरे खोडून काढण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केल्याचे आढळून आले आहे. ही राजमुद्रा होळकर साम्राज्याचे कुलचिन्ह आहे.

अहिल्याबाईंच्या या मुद्रेवर एका बाजूला समृद्धीचे प्रतीक गव्हाच्या लोंब्या, तर दुसर्‍या बाजूला अफूचे तुरे दिसत आहेत. खाली 'प्राहोमेशालभ्या श्रीकर्तृःप्रारब्धात्' हे वचन कोरलेले आहे. 'जो प्रयत्न करतो, त्याला यश मिळते, कर्तव्यावर प्रसन्न होऊन ईश्वर धन आणि यश देतो' असा त्या वचनाचा अर्थ आहे. त्या काळात अफू हे भरपूर पैसा देणारे पीक म्हणून त्याची निर्यात होत असे, म्हणून गव्हाबरोबरच तेही राजमुद्रेवर दाखवण्यात आले आहे. राज्याचे प्रतीक छत्र, वंशाचे आणि क्षत्रियत्वाचे प्रतीक सूर्य, यशाचे प्रतीक अश्व, दैवी आशीर्वादाचे प्रतीक नंदी, एका बाजूला पराक्रमाचे प्रतीक तलवार, दुसर्‍या बाजूला विजयाचे प्रतीक भगवे निशाण लावलेला भाला आहे. ही राजमुद्रा 2014 मध्ये आढळून आली होती.

या नवग्रह मंदिराच्या बांधकामाचा खर्च अहिल्याबाईंच्या हुजूर खासगीतून करण्यात आला असावा, हेे या राजमुद्रेवरून स्पष्ट होते, असे मत देवस्थान समितीचे धर्मशास्त्र अभ्यासक व सहव्यवस्थापक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी व्यक्त केले.

मध्ययुगीन कालखंडात अफूचा औषधी म्हणून उपयोग होत असे. जखमी सैनिकांवर उपचार करताना त्यांच्या बधिरीकरणासाठी अफूचा उपयोग केला जात असे, तसेच इतर अनेक औषधांमध्ये त्याचा उपयोग केला जात असे. म्हणून त्याला जगभरातून मागणी होती व त्याच्यातून प्रचंड उत्पन्न मिळत असे. म्हणून त्याचे पीक होळकरांच्या राजमुद्रेवर कोरलेले आहे. याचा अर्थ अफूचे पीक इंदूर साम्राज्यात घेतले जात होते.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये झाला. त्या दहा वर्षांच्या असताना मल्हारराव होळकरांनी त्यांना सून करून घेतले. प्रजाहितदक्ष असलेल्या अहिल्याबाईंनी पुढे इंदूर संस्थानाचा राज्यकारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला. त्यांनी सार्‍या देशभर मंदिरे बांधली व जीर्णोद्धारही केला. कोल्हापूरशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोल्हापुरातील मंदिरांचाही त्यांनी जीर्णोद्धार केला. त्याच वेळी नवग्रह मंदिराचेही बांधकाम त्यांनी केले व त्या चबुतर्‍यावर आपली राजमुद्रा लावली.

अहिल्याबाई होळकर यांनी भारतभर विविध जलाशये, नदी घाट, मंदिरे यांची निर्मिती केली, असा इतिहास आहे. श्री अंबाबाई मंदिराच्या प्राकारातील नवग्रह मंदिरातील मूर्ती अर्वाचीन वाटतात, पण ज्या चबुतर्‍यावर त्या बसवण्यात आल्या आहेत, तो एखाद्या प्राचीन मंदिराचा भाग असावा. या विषयावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
– उमाकांत राणिंगा, मंदिर रचना व मूर्तिशास्त्र अभ्यासक

मंदिर परिसरातील प्राकार, ओवर्‍या तसेच देवस्थान समितीच्या क्षेत्रातील प्राचीन वास्तू यांचे संरक्षण, संवर्धन करण्याचा समितीचा विचार असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. नवग्रह मंदिरातील होळकरांची राजमुद्रा कोल्हापूर आणि अहिल्याबाईंचे नाते स्पष्ट करते. या मुद्रेवरील अक्षरे कशी खोडली गेली, याची चौकशी करू.
– शिवराज नायकवडी, व्यवस्थापक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news