नागणवाडी प्रकल्पात होणार पाणीसाठा | पुढारी

नागणवाडी प्रकल्पात होणार पाणीसाठा

गारगोटी ; रविराज वि. पाटील : बहुचर्चित असलेला नागणवाडी प्रकल्प तब्बल 22 वर्षांनंतर पूर्णत्वास गेला आहे. या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होणार असल्याने भुदरगड व कागल तालुक्यांतील तब्बल एक हजार 65 हेक्टर क्षेत्रातील ओसाड जमिनीवर हिरवं सोनं पिकवता येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

दिंडेवाडी-बारवे परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेतीचा पाण्याचा गंभीर प्रश्?न होता. त्यामुळे शासनाने 31 जानेवारी 2000 रोजी या प्रकल्पास माजी आमदार बजरंग देसाई यांच्या कालावधीत मंजुरी मिळाली. 12.93 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या प्रकल्पाच्या कामास 2008 साली सुरुवात झाली. माजी आमदार के. पी. यांच्या प्रयत्नामुळे 2009 सालापर्यंत 40 टक्के माती काम व सिंचन विमोचकाचे काम झाले. पुनर्वसनाचा प्रश्?न मार्गी न लागल्याने प्रकल्पग्रस्तांना 2010 साली या प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. 334 प्रकल्पग्रस्तांचे 95.811 हेक्टर क्षेत्र या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले होते. तब्बल 9 वर्षे हा प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्यामुळे रखडला होता. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीबाबत शेतकर्‍यांच्यामध्ये साशंकता निर्माण झाली होती.

2019 साली आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्?नासह 72.58 कोटी रुपयांची सुधारित मान्यता घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला. 334 खातेदार प्रकल्पग्रस्तापैकी 91 प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले आहे. 243 प्रकल्पग्रस्तांना 112.13 हेक्टर पर्यायी क्षेत्र देय आहे. सद्य:स्थितीत 41 प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यात आले आहे. लाभ क्षेत्रात पुरेशी जमीन वाटपास शिल्लक नसल्याने पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. 147 प्रकल्पग्रस्तांना महसूल विभागाच्या वतीने आर्थिक पॅकेज वाटप करण्यात आले आहे. यावर्षी धरणाच्या घळभरणीसह मातीकाम, सांडवा संधानक, सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले असून धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा करण्यात येणार असल्याचे उपअभियंता एस. के. मेंगाणे यांनी सांगितले.

या प्रकल्पात 8.448 द.ल.घ.मी. पाणीसाठा करण्यात येणार असून कागल व भुदरगड तालुक्यांतील तब्बल 1065 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. भुदरगड तालुक्यातील बारवे, दिंडेवाडी, नागणवाडी, पांगीरे, हेळेवाडी या गावांतील 523 हेक्टर तर कागल तालुक्यातील मांगनूर, हसूर बुद्रुक, हसूर खुर्द या गावांतील 542 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. भुदरगड व कागल तालुक्यांतील तब्बल एक हजार 65 हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार असून गेली कित्येक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांची प्रतीक्षा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे संपली असून या प्रकल्पात 1 जूनपासून पाणी साठा केला आहे. प्रकल्पात 5.3061 द.ल.घ.मी. इतका आजअखेर पाणी साठा झाला आहे.

Back to top button