कोल्हापूर: पंचगंगेच्या पाणी पातळीत चढ-उतार

Kolhapur Monsoon Update
Kolhapur Monsoon Update

कोल्हापूर;पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात शनिवारीही पावसाची उघडझाप सुरू होती. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत चढ-उतार सुरूच आहे. जिल्ह्यातील 64 बंधार्‍यांवर अद्यापही पाणी असल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने आता पूर ओसरण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढचे तीन दिवस ग्रीन अलर्ट म्हणजे पावसाचे प्रमाण अगदी कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दिवसभर 'श्रावणसरी' सारखीच स्थिती होती. अधूनमधून होणारे सूर्यदर्शन, यानंतर पाच-दहा मिनिटांसाठी येणारी मोठी सर, पुन्हा उघडीप असेच चित्र दिवसभर होते. पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठा, मंडई, दुकाने आदी ठिकाणी तुलनेने चांगली गर्दी होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात आजही पावसाचा जोर होता.

शुक्रवारी रात्री 11 नंतर 37 फूट 11 इंचांपासून कमी होत चाललेल्या पंचगंगेच्या पातळीत शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत 37 फूट 9 इंचापर्यंत घट झाली होती. त्यानंतर मात्र पुन्हा पातळी एका इंचाने वाढून 37 फूट 10 इंचावर ती सहा तास स्थिरावली. सायंकाळी 7 वाजता पाणी पातळी 37 फूट 11 इंचावर गेली. यामुळे पुन्हा पंचगंगा इशारा पातळीकडे जाईल, अशी भीती होती. मात्र रात्री नऊ वाजता पुन्हा पातळी 37 फूट 10 इंचावर आली व स्थिर झाली.

जिल्ह्यात शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 25.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तिथे 67.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. चंदगड 51.3, आजरा 47.9, भुदरगड 40.1, राधानगरी 39.9, पन्हाळा 27.7, शाहूवाडी 23.6, गडहिंग्लज 19.5, करवीर 18, कागल 15.6, शिरोळ 7.5 तर हातकणंगलेत 7.4 मि.मी. पाऊस झाला.

तीन दिवस कमी पाऊस जिल्ह्यात पुढील तीन दिवस कमी पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाने 18 ते 20 जुलै या कालावधीसाठी जिल्ह्याला ग्रीन अलर्ट दिला आहे. यामुळे काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात आजअखेर वार्षिक सरासरीच्या 31.8 टक्के पाऊस झाला आहे.

कासारी (61), आंबेओहळ (60) व चिकोत्रा (50) वगळता जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी उर्वरित 12 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. घटप्रभा 170 मि.मी., कोदे 147, पाटगाव 137, तुळशी 135, राधानगरी 133, कुंभी 125, जंगमहट्टी 120, दूधगंगा 117, चित्री 100, वारणा 90, जांबरे 79 तर कडवीत 78 मि.मी. पाऊस झाला.

राधानगरी धरण 67 टक्के भरले

जिल्ह्यातील 61 बंधार्‍यांवर अद्याप पाणी आहे. यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. राधानगरीसह वारणा, दूधगंगा, कासारी, कुंभी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरण शनिवारी सकाळी आठ वाजता 67.52 टक्के भरले. तुळशी 66, वारणा 69 तर दूधगंगा 57.60 टक्के भरले आहे.

पूर पाहण्यासाठी गर्दी

शनिवार असल्याने पंचगंगेचा पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. मात्र गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर जामदार क्लब, तोरसकर चौक आणि शिवाजी पुलावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे केवळ शिवाजी पुलाकडून पिकनिक पॉईंटकडे नागरिकांना चालत सोडले जात होते. जुन्या शिवाजी पुलावरही कोणालाही सोडले जात नव्हते. यामुळे नव्या पुलावर वारंवार बघ्याची गर्दी होत होती.

75 लाखांचे नुकसान

जिल्ह्यात आजअखेर तीन जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. 80 पक्क्या तर 150 कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. सहा सार्वजनिक मालमत्तेसह 232 खासगी मालमत्तांचे मिळून आतापर्यंत 75 लाख 50 हजारांचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाने रंकाळा-चौके आणि चंदगड-इब—ाहिमपूर, गौसे या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news