कोल्हापूर : माणगांव येथे घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

कोल्हापूर : माणगांव येथे घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

सरुड : पुढारी वृत्तसेवा : माणगांव (ता. शाहूवाडी) येथे बंद घरात शिरून अज्ञात चोरट्याने तिजोरीतील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज हातोहात लंपास केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. उमा लक्ष्मण कदम (रा. माणगांव, ता. शाहूवाडी) यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पंधरवड्यात गावात घरफोडीची ही दुसरी घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगांव (ता. शाहूवाडी) येथील उमा लक्ष्मण कदम (वय ४३) rh गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास राहत्या घराचा दरवाजा बंद करून गावातील आपल्या भावाच्या घरी गेल्‍या हाेत्‍या. येथे चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल घेऊन काही वेळाने ही महिला घराकडे आली. यावेळी घराचा उघडलेला दरवाजा दिसून आला. त्याचवेळी उमा कदम यांनी घरात जाऊन पाहिले असता लोखंडी तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी, कानातील टॉप्स, फुले, साखळी, अंगठी असे साडेपाच तोळे दागिने तसेच ३० हजार ५०० रुपये रोकड मिळून सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी सायंकाळी शाहूवाडी पोलीस ठाण्यात त्‍यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान शनिवारी (ता.१६) सकाळी माणगांवात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांच्या पथकाने तपासाच्या दृष्टीने परिसराची पाहणी केली. यावेळी श्वानपथक परिसरातच घुटमळले. गुन्ह्याची पद्धत पाहता आरोपीला लवकरच जेरबंद करण्याचा विश्वास पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांना आळा शक्य

चोरी, दरोडा सारख्या गुन्ह्यांच्या बाबतीत नागरिकांची सावधानता महत्त्‍वाची आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणांची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. मारामारी, खून, चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसला आहे. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत आणि समाजाची गरज समजून १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी मुख्य मार्ग तसेच चौकांच्या ठिकाणी  सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button