पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांच्या वाढत्या वाहतुकीमुळे ऐतिहासिक तीन दरवाजाला धोका होऊ शकतो. यासाठी पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदने त्वरित तीन दरवाजातून होत असलेली पर्यटक वाहनांची वाहतूक थांबवावी, असे पत्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेसह पोलिस व तहसील कार्यालय यांना पाठवले आहे. त्यामुळे पन्हाळावासीयांना वाहतुकीसाठी कायमस्वरूपी रस्ता कधी मिळणार, याची चिंता लागून आहे.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पन्हाळ्याचा मुख्य रस्ता प्रवासी कर नाक्यावरच खचल्याने त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. हा रस्ता पूर्णच तुटला असल्याने येथून दुचाकी व चारचाकी वाहने जाऊ शकत नाहीत. येथून फक्त पायी चालत जाण्याची सोय केली आहे. खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू करून तात्पुरती सोय म्हणून लवकरच दुचाकी-चारचाकीसाठी रस्ता सुरू करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एस. एस. साळोखे यांनी दिले होते. मात्र, गेले दोन आठवडे रस्ता दुरुस्तीचे कामही ठप्प आहे. काम बंद झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त आहे.
यातच पुरातत्त्व विभागाने तीन दरवाजा मार्गे सध्या होत असलेली दुचाकी, चारचाकी गाड्यांची वाहतूकही नियंत्रित करण्याचे पत्र नगरपालिकेस दिले आहे. सध्या पर्याय म्हणून वापरला जात असलेल्या तीन दरवाजामधून सुरू असणारा मार्गदेखील बंद होणार की काय? अशी चिंता नागरिकांना लागून राहिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यायी रस्त्यासाठी रेडे घाटी ते पन्हाळा हा रस्ता प्रस्तावित करून तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, वनविभाग याकरिता लागणारे कागदोपत्री दस्तावेज एकेक करून मागत असल्याने हा रस्तादेखील सरकारी यंत्रणेत खोळंबला आहे. पन्हाळ्याचा रस्ता होणार तरी कधी, या चिंतेने नागरिक त्रस्त झाले आहेत. पन्हाळ्याला सध्या बुधवार पेठ येथून चालत यावे लागते. एसटी महामंडळाने देखील पुरेशा प्रमाणात बसेस सुरू ठेवल्या नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. शासनदरबारी असलेली या रस्त्याबाबतची उदासीनता पन्हाळा येथील नागरिकांना त्रासदायक ठरत असून ते या रस्त्याबाबत आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
वास्तूला धोका पोहोचल्यास नगरपालिका जबाबदार
तीन दरवाजा ही ऐतिहासिक व संरक्षित वास्तू असून या वास्तूमधून जाणारा रस्ता हा फक्त पन्हाळकर नागरिकांसाठी खुला केला होता. मात्र, सध्या या रस्त्याने पर्यटक, शासकीय कर्मचारीवर्ग यांच्या चारचाकी गाड्या, अन्य अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने व हॉर्नच्या आवाजाने तीन दरवाजाला कंपनांमुळे धोका संभवतो. तीन दरवाजाला यापूर्वीच तडे गेले आहेत. त्यामुळे तीन दरवाजा ढासळल्यास अथवा या वास्तुस धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पन्हाळा पालिकेची राहील, असेही 'पुरातत्त्व'ने पत्रात म्हटले आहे.