कोल्हापूर : महापुराचे सूक्ष्म नियोजन करूनच शहराचा विकास आराखडा

कोल्हापूर : असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील. डावीकडून राज डोंगळे, आ. चंद्रकांत जाधव, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, उपाध्यक्ष विजय चोपदार.
कोल्हापूर : असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील. डावीकडून राज डोंगळे, आ. चंद्रकांत जाधव, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, उपाध्यक्ष विजय चोपदार.
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वत्तसेवा : कोल्हापूरमधील महापुराचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे, तरच संभाव्य धोक्यापासून कसा बचाव करता येईल. त्यासाठी नव्याने शहर विकास आराखडा तयार करताना विचार केला पाहिजे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी नदीकाठी संरक्षक भिंत उभारणे हा चांगला पर्याय होऊ शकतो, तसेच नव्याने पूूररेषा आखण्याचे नियोजन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

तर शहर विकासासाठी हद्दवाढ गरजेचीच आहे, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.

पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सर्वाधिक फटका बसल्याचे सांगून ना. जयंत पाटील म्हणाले, 2005 नंतर 2019 व यंदाच्या महापुराची
कारणे वेगळी आहेत. यावेळी धरणातील पाणी सोडले म्हणून पूर आला नाही; तर पाऊसच प्रमाणाबाहेर झाला. अनेक ठिकाण ढगफुटी झाली. त्यामुळे महापूर आला. त्यामुळे यापुढे नेमके काय नियोजन करायचे, असा प्रश्न शासन म्हणून आमच्यासमोर उभा आहे.

यावेळी किमान धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले. कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नदीतून 3 लाख क्युसेक पाणी वाहत होते. त्याचवेळी त्यापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरणातून होत होता. त्यामुळे सांगली शहर आणि परिसर, शिरोळ परिसरासह कोल्हापूर शहर आणि परिसराला 2019 च्या तुलनेत पुराचा फटका कमी प्रमाणात बसला. निसर्गाने यंदा महापुराची एक रेषा तयार केली आहे. याचा विचार करून भविष्यात शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक्ट असोसिएशनने आपले योगदान द्यावे.

केवळ उंच इमारती उभ्या करू नका तर पाण्याचा योग्य निचरा होण्याचे नियोजन करा. शहरांप्रमाणे ग्रामीण भागाचाही विस्तार होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास आराखडा तयार करताना महापूर डोळ्यासमोर ठेवूनच नियोजन करा, असेही ना. पाटील यांनी सांगितले.

हदृवाढ करणे गरजेचेच : ना. मुश्रीफ

शहराला सौंदर्य प्राप्त करून देण्याचे काम आर्किटेक्ट करतात, असे सांगून कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केवळ उंच इमारती बांधून शहराचा विकास होणार नाही. कारण शहरवाढीला आता मर्यादा आल्या आहेत. महापुराचा फटका शहरालाही माठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे आहे त्याच जागेवर बांधकामाचा भार टाकण्यापेक्षा शहराची हद्दवाढ करणे गरजेचे आहे.

सध्या 42 गावांचे प्राधिकरण तयार केले आहे. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्राधिकरण आल्यापासून या गावांचा काहीही विकास झालेला नाही. प्राधिकरणात काम करण्यासाठी कर्मचारीवर्ग नाही, बांधकाम परवानगी वेळेत मिळत नाही. अशा प्राधिकरणामुळे शहर वेठीस धरले जात असून विकास खुंटला आहे. त्यामुळे तत्काळ हद्दवाढ झालीच पाहिजे, असे ना. मुश्रीफ यांनी सांगितले.

नाले, ओढ्यांचे रुंंदीकरण : ना. पाटील

तालुका पातळीवर अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या भागात किती नाले, ओढे आहेत, याची माहिती घेण्यास सांगितले आहे. यातून नाले-ओढ्यांचे रुंदीकरण करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. पावसाचे प्रमाण वाढल्याने महापुराची तीव—ता वाढली. पण भविष्यात नुकसानीचे प्रमाण कमी होण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी पंचगंगा नदीच्या 67 किलोमीटर पात्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. मुंबई व पुण्याच्या विकासाच्या तुलनेत कोल्हापूर मागे आहे. कोल्हापुरातील विमानतळ विस्तारत आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यात आली आहे. याबरोबरच जर पुणे – कोल्हापूर रस्त्याला समांतर रेल्वे लाईन झाली तरी उद्योग विस्ताराला याचा लाभ होऊ शकतो, असे मतही ना. पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी आ. चंद्रकांत जाधव यांनी आर्किटेक्टनी शहराला घर समजून शहराची रचना करावी, महापुराने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते ते होऊच नये यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी 50 वर्षांतील असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेऊन शहरातील विविध विकासकामासाठी सदैव मदत करण्यास तत्पर असल्याचे सांगितले. या निमित्ताने असोसिएशनचे ज्येष्ठ सभासद प्रमोद बेरी, रमेश पोवार आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष विजय चोपदार व पदाधिकारी उपस्थित होते. आभार राज डोंगळे यांनी मानले.

कागलही घ्या!

हद्दवाढ गरजेची असल्याचे सांगताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शहराचा विकास होत असताना ग्रामीण भागाचाही विकास झाला पाहिजे. पण तसे होत नाही. शहराची हद्दवाढ झाली आणि ग्रामीण भागाचाही विकास झाला तर चांगलेच आहे. यासाठी हद्दवाढ करताना कागलचाही त्यात समावेश केला तरी आपली काही हरकत असणार नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news