नकली धर्मवीर स्वार्थासाठी लाचार : विनायक राऊत | पुढारी

नकली धर्मवीर स्वार्थासाठी लाचार : विनायक राऊत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नकली धर्मवीराने स्वतःच्या स्वार्थासाठी लाचारी पत्करली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ईडी चौकशीची मागणी करणारे आज त्यांच्या पायाशी लोटांगण घालत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता घणाघाती टीका केली.

केशवराव भोसले नाट्यगृहात शिवसेनेतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांनी कोल्हापुरातून शिंदे गटातून निवडणूक लढवूनच दाखवावी, असे जाहीर आव्हान दिले. शिवसेना संपवण्याची भाषा करणारे स्वत: संपतील, असे सांगून राऊत म्हणाले, दोन वेळा आमदार, पराभवानंतरही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, तरीही केवळ पद वाचविण्यासाठी गद्दारी केली. सगळी पदे स्वत:लाच घ्यायची. त्यातून काही राहिली तर पत्नीला, नंतर मुलांना द्या म्हणायचे. अशा प्रवृत्तीचे लोक शिवसेनेत नकोच होते. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फलक लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आगामी निवडणुकीत या बेईमानांना त्यांची जागा दाखवा, असे राऊत म्हणाले. माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांना भगव्याचे शिलेदार करून विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.

ज्या शिवसेनेने तुम्हाला उभे केले, त्याच सेनेला संपवण्याचे पाप बंडखोर आमदार करत आहेत. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ते बंडखोर आमदार यापुढे रस्त्यावर भीक मागत फिरतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला. दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्र संपवायचा आहे, असा आरोप करत राऊत म्हणाले, त्यांच्या पापात बंडखोर आमदार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना मजबूत करण्यासाठी लवकरच विधानसभानिहाय मेळावे घेणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार आता कोल्हापुरातील रखडलेले प्रश्न सोडवणार असे म्हणतात. मग पद असताना त्यांनी काय केले, असा सवाल संजय पवार यांनी केला. शिवसेनेच्या बळावर निवडणूक जिंकता येत नसल्याचे वक्तव्य क्षीरसागर यांनी केले होते. त्याची ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकविण्यात आली. ईडीने ज्यांची चौकशी सुरू केली, त्यांची माहिती आपण माहिती अधिकाराखाली मागवल्याचे सुनील मोदी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रवी इंगवले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, रवी चौगुले, शुभांगी पोवार, आदी उपस्थित होते. माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. हर्षल सुर्वे यांनी स्वागत केले. मंजित माने यांनी आभार मानले.

मला जेवणही बंटी पाटील यांच्या पैशातून…

मला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या बंडखोर माजी आमदारांनी घरी जेवायला बोलवले. पण नंतर समजले की, या जेवणाचे पैसे त्यांनी बंटी पाटील यांच्याकडून घेतले. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत बेईमानीची कीड मी स्वतः अनुभवल्याचा संदर्भ विनायक राऊत यांनी देताच सभागृहात एकच हशा पिकला.

नरके अनुपस्थित

माजी आमदार चंद्रदीप नरके आजच्या मेळाव्याला अनुपस्थित हेाते. शिंदे गटाच्या बंडखोरीपासून शिवसेनेच्या आंदोलनात नरके कधीच सहभागी झाले नाहीत. अद्याप त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली नाही. खा. संजय मंडलिक हे दिल्ली येथे असल्याने व खा. धैर्यशील माने आजारी असल्याने मेळाव्याला आले नाहीत, असे सांगण्यात आले.

Back to top button