कस्तुरी क्लब वर्धापनदिन: दररोज 10 हजार पावले चाला; डॉ. अक्षय शिवछंद

कोल्हापूर;पुढारी वृत्तसेवा: स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार घेणे आणि व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. धावपळीच्या जीवनशैलीत व्यायामासाठी स्वतंत्र वेळ काढणे अनेकदा शक्य होत नाही. यामुळे दिवसभरात घरात 10 हजार पावले चालणे हाही व्यायामच ठरत असल्याचे मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. अक्षय शिवछंद यांनी सांगितले.
दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी आयोजित स्नेह संमेलनात डॉ. शिवछंद यांनी ‘स्तनाचा कॅन्सर: समज-गैरसमज आणि जनजागृती’ या विषयावर मार्गदर्शन केले. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील बहुउद्देशीय सभागृहात हा उपक्रम झाला. याला मुंबई आँकॉकेअर सेंटरचे सहकार्य लाभले. डॉ. शिवछंद म्हणाले, ब्रेस्ट कॅन्सरचे योग्यवेळेत निदान होणे गरजेचे आहे. असे झाल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. काखेत किंवा स्तनाला वेदनाविरहीत गाठ असल्यास त्याकडे दुर्लक्षित न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि व्यसनापासून दूर राहून कर्करोग टाळणे शक्य आहे. रजोनिवृत्तीनंतर लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी हे तितकेच महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि वयाच्या पन्नाशीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे. बाळंतपणात बाळाला किमान 6 महिने स्तनपान होणे आवश्यक आहे. मात्र, नोकरदार महिलांकडून केवळ दोन-तीन महिनेच बाळाला स्तनपान होते. यामुळेही कर्करोगाला पोषकता मिळत असल्याचे डॉ. शिवछंद यांनी सांगितले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. शिवछंद यांनी उत्तरे दिली