कोल्हापूर : कंपन्या ‘मालामाल’; गुंतवणूकदार ‘कंगाल’ | पुढारी

कोल्हापूर : कंपन्या ‘मालामाल’; गुंतवणूकदार ‘कंगाल’

कोल्हापूर : गौरव डोंगरे : गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळवून देणार्‍या कंपन्यांनी जिल्ह्यातील कानाकोपर्‍यात हातपाय पसरले आहेत. शेतकर्‍यापासून प्राध्यापकांपर्यंत, डॉक्टरांपासून पोलिसांपर्यंत अनेकांना यामध्ये ओढण्यात या ‘प्रतिनिधींना’ यश आले आहे. ज्यांना शेअर मार्केटचा ‘अ’ देखील माहिती नाही, त्यांना शेअर मार्केटमधून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले जाते आहे. मात्र अचानकपणे गायब होणार्‍या या कंपन्यांमुळे अनेकांवर ‘कंगाल’ होण्याची वेळ आली आहे.

श्रीमंतीचे असेच आमिष दाखविणार्‍या एक कंपनीने 60 हजारांहून अधिक जणांचे सुमारे 268 कोटी गुंतवून घेतल्याचा अंदाज आहे. यातील 30 टक्केहून अधिक जण कोल्हापुरातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 9 फेब—ुवारीपासून परतावा मिळणे हळूहळू कमी झाले. यानंतर काहींचे पैसे चुकते करणे तर पूर्णच बंद करण्यात आले.

सावकारी कर्ज आणि गृहकलह

श्रीमंतीच्या नादात काहींनी सावकाराकडून कर्ज घेऊन पैसे गुंतवले आहेत. पण मार्च महिन्यापासून परतावा बंद झाल्याने सावकाराचे हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न आता गुंतवणूकदारांपुढे आहे. अशा गुंतवणूकदारांना आता सावकारांचाही सामना करावा लागतो आहे. तसेच काही महिलांनी पतीच्या परवानगीशिवाय गुंतवलेल्या रकमेमुळे अनेक घरात सध्या ‘गृहकलह’ सुरू झाला आहे.

जुलैपर्यंत पैसे परताव्याचा वायदा

श्रीकांत सरांनी अनेकांना श्रीमंतीचा ‘आशीर्वाद’ दिला आहे. सुरुवातीला गुंतवणूक करणारे अनेकजण गब्बर झाले आहेत. पण त्यापुढील साखळी सध्या चिंतेत आहे. मार्च महिन्यापासून पैसे न मिळाल्याने त्यांची झोप उडाली आहे. हे प्रकरण पोलिसांकडे जाणार असल्याचे समजताच जुलैपर्यंत परतावा देण्याचा वायदा करण्यात आल्याचे समजते.

धनादेश एक वर्षानंतरचे

कंपनीच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित करणार्‍यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांची रक्कम मोठी आहे, त्यांना धनादेश वितरित केले जात आहेत. पण या धनादेशावर एक वर्षानंतरची तारीख टाकण्यात आल्याचे काहींनी सांगितले.

Back to top button