शिंगणापूर उपसा केंद्राला पुराच्या पाण्याचा वेढा | पुढारी

शिंगणापूर उपसा केंद्राला पुराच्या पाण्याचा वेढा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसागणिक वाढ होत असून पूर आला आहे. परिणामी कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणार्या शिंगणापूर उपसा केंद्राला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. परंतू अद्याप पाणी पुरवठ्यासाटी कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, उपसा केंद्र पुराच्या पाण्यात गेल्यास शहराला दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. पंचगंगा नदीतून शिंगणापूर बंधारा येथे पाण्याचा उपसा केला जातो. त्याबरोबरच भोगावती नदीतून बालिंगा व नागदेववाडी येथे पाणी उपसा करण्यात येतो. तीन उपसा केंद्रातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शिंगणापूर उपसा केंद्राजवळ पंचगंगेची पाणी पातळी वाढली आहे. उपसा केंद्राला विद्युत पुरवठा करणारे सबस्टेशन पाण्यात गेले आहे. त्याबरोबरच आता उपसा केंद्राला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

पावसामुळे नदीतील पाणी पातळीत वाढ होत आहे. छोटे-मोठे बंधारे हे पाण्यामध्ये बुडाले आहेत. धरणक्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी सुरु आहे. सध्या नदीची पाण्याची पातळी धोकापातळी जवळ आली आहे. पुराच्या पाण्यात महापालिकेची पाणी उपसा केंद्रे गेल्यास शहरास पाणी पुरवठा बंद झाल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागाने परजिल्हयातून 20 टँकर उपलब्ध करुन घेतले आहेत. पूरस्थितीत या टँकरद्वारे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

पाणी पुरवठ्यासाठी वीस टँकर भाड्याने

महापुराची स्थिती उद्भवल्यास आणि शहराला पाणीपुरवठा करणारे उपसा केंद्रे पुराच्या पाण्यात गेल्यास पाणी टंचाई भासायला नको म्हणून महापालिका प्रशासनाने वीस टँकर भाड्याने घेतले आहेत. कळंबा फिल्टर हाऊस व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथे टँकर तैनात ठेवले आहेत.

Back to top button