

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : प्लास्टिक बंदीबाबत महापालिकेची कारवाई अन्यायकारक असून प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा मंगळवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत देण्यात आला. प्लास्िटक बंदी तसेच जीएसटी प्रश्नाबाबत चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. कायदा व दंडाचा बडगा न दाखवता व्यापारी व ग्राहकांचे प्रबोधन करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चेंबरचे संजय शेटे यांनी प्रास्ताविकात व्यापार्यांवर थेट कारवाई न करता सुरुवातीला त्यांच्याकडील प्लास्टिक जप्त करा व दुसर्यावेळी दंडाची आकारणी करा, असे सांगितले. कोरोनाच्या लॉकडाऊन व ई-कॉमर्समुळे व्यापारी आधीच डबघाईला आलेला आहे. त्यातच 18 जुलैपासून अन्नधान्य व खाद्यान्न पदार्थांवर 5 टक्के जीएसटीवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे व्यापारी सर्व बाजूंनी पिंजला असून महापालिकेडून होत असलेल्या कारवाईमुळे व्यापारी आर्थिक डबघाईला आला आहे. महापालिकेकडून अशीच कारवाई चालू राहिली, तर व्यापार्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यापार्यांनी आणलेल्या वेगवेगळ्या प्लास्टिकच्या वस्तू अधिकार्यांसमोर ठेवल्या. यापैकी कोणत्या वस्तूंना परवानगी आहे आणि कोणत्या नाही याची सविस्तर माहिती देण्यास सांगितले. यावेळी पर्यावरण अधिकारी राहुल राजगोळकर व समीर व्याघ—म्बरे यांनी त्या वस्तूंबद्दल सविस्तर माहिती देऊन कोणते प्लास्टिक चालते व कोणते चालत नाही, याची माहिती दिली.
यावेळी हर घर तिरंगा या उपक्रमाची माहीती देऊन चेंबरच्या सर्व संलग्न संघटनांनी आपल्या आस्थापना व घरावर तिरंगा ध्वज फडकवावा तसेच आपल्या कर्मचार्यांनादेखील तिरंग्याचे वाटप करून त्यांच्या घरोघरी तिरंगा लावण्याबाबत सूचना द्यावी, असे सांगितले.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव वैभव सावर्डेकर, संचालक अजित कोठारी, संभाजीराव पोवार, राहुल नष्टे, संपत पाटील, इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अनिल धडाम, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, संदीप वीर व विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.