

कोल्हापूर ; पूनम देशमुख : नवा जीव जन्माला घालणे म्हणजे प्रसूती. या काळात महिलांचा एकप्रकारे पुनर्जन्मच होतो. महापालिकेसह खासगी रुग्णालयांत प्रसूती मातांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असूनही दरवर्षी माता दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्राव, अॅनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरताहेत.
प्रसूती काळात महिलांचा रक्तदाब मोठ्या प्रमाणावर वाढतो. काही महिलांना रक्तस्राव सुरू होतो. तर कोणाला अॅनिमिया किंवा हृदयाचा आजार असतो. काही मातांच्या प्रसूती काळातील गुंतागुंतीच्या केसेस ग्रामीण भागातून शहरातील रुग्णालयांत येतात. त्या मातांचे दगावण्याचे प्रमाण हे अधिक आहे. त्या तुलनेत मनपा हद्दीतील माता दगावण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत शहराच्या हद्दीतील महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास 28 हजार 715 प्रसूती झाल्या. यामध्ये नैसर्गिक प्रसूती 18 हजार 519 तर अनैसर्गिक म्हणजे सिझेरियन 10 हजार 198 महिलांचे करण्यात आले. 38 महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. यात मनपा हद्दीतील 11, बाहेरील राज्यातील 5, जिल्हाबाहेरील 5, शहराबाहेरील 17 महिलांची नोंद आहे. यामध्ये प्रसूतीदरम्यानच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसोबत कोव्हिडमुळे मृत्यू होणार्या महिलांची संख्या 18 इतकी आहे.
यावर्षी सन 2022 – 23 मध्ये एप्रिल ते आजअखेर 4428 महिलाची प्रसूती झाली असून त्यामध्ये नैसर्गिक प्रसूती 2620 तर अनैसर्गिक प्रसूती 1808 झाल्या आहेत. यावर्षी एकाच मातेचा मृत्यू झाला असून ही दिलासादायक बाब आहे. माता दगावण्याच्या कारणांमध्ये जखमेत पू होणे, हदयाचा आजार, टीबी, स्वाईन फ्लू, न्यूमोनियासारखे तत्सम आजार यांचा समावेश आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली.