अंबाबाई मंदिर पोलिस चौकीचा प्रस्ताव प्रलंबित | पुढारी

अंबाबाई मंदिर पोलिस चौकीचा प्रस्ताव प्रलंबित

कोल्हापूर : गौरव डोंगरे : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला देशभरातून भाविक येत असतात. भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासोबत मंदिर आवारात सुरक्षेची मोठी जबाबदारी देवस्थान समितीवर आहे. मंदिर आवार व परिसरात 82 सीसीटीव्ही, शंभरावर सुरक्षारक्षकांकडून अंतर्गत सुरक्षा तर सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांचा खडा पहारा तैनात आहे. मात्र मंदिरासाठीच्या कायमस्वरूपी ‘पोलिस चौकी’चा प्रस्ताव 10 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे.

वज्र पथक मंदिराबाहेर तैनात

मंदिर परिसरात कोणताही अनुचित किंवा घातपाताचा प्रकार घडणार नाही यासाठी वज्र पथक तैनात आहे. यामध्ये जलद कृती दलाचे शस्त्रधारी पोलिसांचा समावेश आहे. मंदिर आवारात तसेच परिसरात घडणार्‍या सर्व हालचालींवर या पथकाचे विशेष लक्ष आहे. हे वाहन नेहमी मंदिराच्या पश्चिम दरवाजासमोर सतर्क ठेवण्यात येते. पण हे बाह्य सुरक्षेची जबाबदार पार पाडते. तसेच मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर सध्या दोन शिफ्टमध्ये पोलिस बंदोबस्त नेमला जातो.

सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि रात्री नऊ ते सकाळी नऊ असा त्यांचा खडा पहारा असतो. सध्या 22 ते 25 पोलिस कर्मचारी असतात. चारही दरवाजांतून येताना सुरक्षेचा भाग म्हणून तपासणी केली जाते. तीक्ष्ण शस्त्रे, टोकदार वस्तू मंदिरात घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. याच ठिकाणी महिला सुरक्षारक्षकांकडून महिलांकडील पर्स, बॅगांचीही कसून तपासणी करण्यात येते.

खासगी सुरक्षारक्षकांवर जबाबदारी

देवस्थान समितीच्या वतीने 100 खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दर्शन रांगा, व्हीआयपी गेट, तसेच चारही दरवाजांवर हे सुरक्षारक्षक असतात. पहाटे पाच ते दोन व दुपारी 2 ते रात्री 10 यावेळेत त्यांची ड्युटी असते.

Back to top button