

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बचत गटांचीही 'रेश्मा'ने झोप उडवली आहे. बचत गटांतील महिलांना पुढे करून बँका, पतसंस्थांतून लाखो रुपये उचलल्याचे समजते. आता ही कर्जखाती थकबाकीत गेली असून, वसुली करायची कशी? या चिंतेत संस्था आहेत.
15 दिवसांत दामदुप्पट, या व्यवसायाचा जम बसविण्यासाठी 'रेश्मा'ने इचलकरंजीसह जिल्ह्यातील बचत गटांचा आधार घेतला. 10 महिलांचा एक गट अशा पद्धतीने बचत गट तयार करून बचत गटांसाठी कर्ज देणार्या बँका, पतसंस्थांकडे कागदपत्रे सादर करायची, कर्ज मंजूर झाले की, त्यातील 10 टक्के रक्कम संबंधित महिलेला द्यायची तर उर्वरित रक्कम गुंतवणूक म्हणून स्वतःकडे ठेवायची. बचत गटाच्या कर्ज योजनेतून एका महिलेला कमीत कमी 20 हजार, तर जास्तीत जास्त 40 हजार रुपये कर्ज मिळते.
याचा विचार केल्यास कर्जदार महिलेला दोन ते चार हजार, तर 'रेश्मा'ला 18 ते 36 हजार रुपये मिळायचे. जिल्ह्यातील अशा शेकडो बचत गटांतील हजारो महिला जोडल्याचे समजते. सुरुवातीला काही महिलांना परतावा देऊन विश्वास संपादन केला. पैसे परत मिळतात, या समजुतीतून गुंतवणुकीसाठी महिलांची रीघ लागली. बर्यापैकी पैसे जमा झाल्यानंतर 'रेश्मा' गायब झाली. तिचा संपर्क तुटल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. कर्जाचे हप्ते थकल्याने संस्थांनी वसुलीचा तगादा लावला.
पोलिसांसमोर आव्हान
'रेश्मा'विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात पहिली तक्रार दाखल झाली. त्यानंतर कोल्हापूर, इचलकरंजीत तक्रारी दाखल करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणून छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दै. 'पुढारी'वर अभिनंदनाचा वर्षाव
दै.'पुढारी'ने 'रेश्मा'च्या कारनाम्यांची वृत्तमालिका सुरू करून गोरगरीब, कष्टकरी महिलांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणाला वाचा फोडली. त्यामुळे दै.'पुढारी'च्या धाडसाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. तसेच कार्यालयामध्ये 'रेश्मा'च्या आणखी कारनाम्यांची माहिती व स्वानुभव कथन करणार्यांचे फोन खणखणले.
आलिशान बंगल्यात वास्तव्य
सांगली नाक्याजवळील मथुरानगर येथे एका आलिशान बंगल्यात 'रेश्मा'चे वास्तव्य होते. एका सणानिमित्त या बंगल्यावर नेत्रदीपक रोषणाई केली होती. त्यामुळे हा बंगला परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता, तर परिसरात हा एक चर्चेचा विषय होता; परंतु महिन्याभरातच या बंगल्याला कुलूप लागले आहे.