साखर उत्पादन घटणार; भारताची निर्यात वाढणार | पुढारी

साखर उत्पादन घटणार; भारताची निर्यात वाढणार

कुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार : ब्राझीलमध्ये यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत पडलेला सर्वात मोठा भीषण दुष्काळ, पाठोपाठ सुरू असलेला हिमवर्षाव आणि गोठवणारी थंडी ऊस पिकास मारक ठरत आहे. ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, आगामी हंगामात ब्राझील साखर उत्पादन घट होणार आहे. त्यामुळे जागतिक साखर पुरवठ्यात घट होणार आहे. भारतातील साखर उद्योगासाठी ही इष्टापत्ती ठरत असून, साखरेच्या दरात तेजी आली आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना साखरेस किमान विक्री दरापेक्षा अधिक भाव मिळत आहे. साखर कारखानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, ब्राझील च्या दक्षिण मध्य भागात प्रचंड हिमवादळ, हिमवर्षाव व थंडीमुळे ऊस मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे.

हवामान शास्त्रज्ञ अँटोनियो डॉस सँटोज यांच्या अंदाजानुसार, ऑगस्टअखेरीस हिमवादळ पुन्हा परतण्याची शक्यता असून, पुन्हा नुकसान वाढण्याची शक्यता आहे. या हिमवर्षावामुळे उसाचे किती क्षेत्र बाधित होणार, याचा निश्चित अंदाज बांधता येत नसला; तरी ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

ब्राझीलचे साखर उत्पादन सुमारे पन्नास लाख टनांनी घटणार आहे. थायलंडमध्येही साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. याचा परिणाम साखरेच्या जागतिक मागणी-पुरवठ्यावर होणार आहे. परिणामी, भारताच्या साखर उद्योगाला निर्यातीच्या संधी वाढल्या आहेत.

यामुळे साखरेचे दर वधारले असून, प्रथमच ते केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान विक्री दरापेक्षा (प्रतिक्विंटल 3,100 रुपये) वाढले आहेत. साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांची थकीत देणी, कामगार पगार देणे सुलभ झाले आहे.

उत्तर प्रदेशात 23.12 लाख हेक्टर्स ऊस असून, 11.98 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात ऊस क्षेत्रात 11 टक्के वाढ झाली आहे. 12.75 लाख हेक्टर्स ऊस असून, 12.13 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. कर्नाटकातही उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 5.22 लाख हेक्टर्स ऊस असून, 4.87 दशलक्ष मे. टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. इतर राज्यांत एकूण 5.46 दशलक्ष मे. टन उत्पादनाचा अंदाज ‘ईस्मा’ने व्यक्त केला आहे.

Back to top button